शाहू मिल स्मारकासाठी लागेल तेवढा निधी सरकार देईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 11:23 AM2022-05-07T11:23:29+5:302022-05-07T11:24:13+5:30
शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांचे कार्य एवढे मोठे आहे की त्यांच्याबद्दलचे कोणतेही काम हाती घेतो तेव्हा ५० कोटी १०० कोटी असे निधीचे आकडे जाहीर करायचे नसतात.
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांनी रयतेची काळजी घेत शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार म्हणून दूरदृष्टीने डोंगराएवढे काम केले आहे. शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांचे कार्य एवढे मोठे आहे की त्यांच्याबद्दलचे कोणतेही काम हाती घेतो तेव्हा ५० कोटी १०० कोटी असे निधीचे आकडे जाहीर करायचे नसतात. शाहू मिलमध्ये साकारण्यात येणाऱ्या शाहू स्मारकासाठी लागेल तेवढा निधी राज्य शासन देईल, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे दिला.
राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत कोल्हापुरातील शाहू मिलमध्ये आयोजित मुख्य समारंभात त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोल्हापूरकरांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शाहू महाराज हे विकासाची दूरदृष्टी असलेले राजे होते. काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर करताना काही जणांनी टीका टिपण्णी केली की सगळ्या घोषणा जाहीर झाल्या; पण स्मारकांसाठी निधीची घोषणा केली नाही.
खरे तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांच्याबद्दलचे काम हाती घ्याल त्यावेळी आकड्यांतील निधी जाहीर करण्याची गरज नसते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मिलमधील स्मारक झाले पाहिजे असे सांगितले आहे. पण त्यासाठी ५० कोटी १०० कोटी हा निधी जाहीर करून आपण काय साधणार आहोत, त्याचा काही उपयोग होत नाही. पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, शाहू मिल स्मारकाचा आराखडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माझ्यापुढे सादर करणार आहेत. आपण आराखडा सादर करा, स्मारकाचे काम पूर्ण होईपर्यंत जो लागेल तो निधी सरकार देईल.
मुंबईतील स्मारक व सारथीचेही काम लवकरच
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबईत शाहू स्मारक उभारण्यासाठी कार्यवाही केली जाईल. सारथी संस्थेद्वारे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. संस्थेच्या कोल्हापूर येथील कार्यालयासाठी व वसतिगृहासाठी शासनाने पाच एकर जागा दिली आहे. ती साइट आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी पाहिली असून, चांगला प्लॅन तयार केला आहे. हे कामदेखील लवकरच सुरू केले जाईल.