मोहन सातपुतेउचगाव : महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. समाजातील विविध घडामोडींची ते आवर्जुन दखल घेत असतात आणि त्यावर आपली भूमिका देखील स्पष्ट करत असतात. आनंद महिंद्रा यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाला साथ देत एक खास फोटो ट्विट केला होता. "स्वातंत्र्यदिनाचा एवढा गवगवा का केला जातोय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर या दोघांना विचारा. कोणत्याही लेक्चरपेक्षा हे दोघं तुम्हाला चांगलं समजावून सांगतील. जय हिंद" असं आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. या फोटोची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. तो फोटो आहे कोल्हापुरातील उचगाव येथील हिंदुराव दत्तात्रय पाटील (वय -७६) व त्याच्या पत्नी रुक्मिणी हिंदुराव पाटील (७२) यांचा.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाला देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं होतं. या उपक्रमात उचगाव येथील हिंदुराव दत्तात्रय पाटील व त्याच्या पत्नी रुक्मिणी पाटील दाम्पतंय ही जोशाने सामील झाले. आपल्या उतरत्या वयातही या दाम्पत्याने घरावर झेंडा लावण्यासाठी पतीचा सहारा घेत लोखंडी बॅरेल वर उभे राहून रुक्मिणी पाटील यांनी घरावर ध्वज लावला.गल्लो गल्ली मधील तिरंग्याचा माहोल कॅमेऱ्यामध्ये टिपत असताना विक्रम चोगुले यांनी पाटील पती पत्नीचा हा फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा फोटो बघता बघता इतका व्हायरल झाला की या फोटोची दखल महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनीही घेतली.पती-पत्नी दोघांच्या आधाराने चालवतात संसारहिंदुराव पाटील हे शाहू मिल येथे फिडर पदावरून निवृत्त झाले आहे. शाहू मिल बंद पडली आणि गरिबीचे दिवस आले. उचगाव मध्ये गेली ४०वर्षापासून ते राहतात. पत्नी रुक्मिणीच्या आधाराने ते संसार चालवतात. त्याचे मुळ गाव पुनाळ (ता.पन्हाळा) आहे. त्याचा मुलगा दिलीप पाटील सेंट्रिंग कामगार आहे.
पूर्वी शाळा व महाविद्यालयात झेंडा वंदन कार्यक्रमात जातं असतं. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते फडकवलेला राष्ट्र ध्वज मनाला उभारी देत होता. आता स्वतःच घरावर फडकवल्याचा आनंद द्विगुणित झाला आहे - हिंदुराव व रुक्मिणी पाटील, उचगाव
प्रत्येकाच्या घरात लोकशाहीमार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने संविधान रुपी राष्ट्रध्वज घरावर लावण्याचे स्वतंत्र मिळाले. पाटील पती-पत्नीने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवत असताना मी हा फोटो कैद केला. त्याची दखल आनंद महिंद्रा यांनी घेतली याचा आनंद झाला. - विक्रम चोगुले, उचगाव