कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाची जागा ताब्यात घेतली नाहीतर त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दरोडा टाकला असून जिल्ह्यात आता कोणती आपत्ती आली म्हणून एवढ्या तातडीने जागा ताब्यात घेतली? असा सवाल करत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आडून पालकमंत्री दीपक केसरकर यांना ही जागा बळकावयाची आहे. असा आरोप शेतकरी संघाने आयोजित केलेल्या बैठकीत करण्यात आला. जिल्ह्यातील ४० हजार सभासदांच्या अस्तित्वाचा प्रश्न असून आमदार, खासदारांनी भूमिका जाहीर करावी, अन्यथा त्यांना किंमत मोजावी लागेल. असा इशाराही देण्यात आला.शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील इमारतीमधील तीन मजले देवस्थान समितीने ताब्यात घेतल्याने वाद उफाळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या बैठकीत सभासदांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. उद्या, बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णयही घेण्यात आला.शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा गैरवापर करून हे कृत्य केले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या ताबा आदेशाची प्रत पालकमंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय सहायक अमित कामत हे कसे सोशल मीडियावर टाकतात. पालकमंत्र्यांचा या जागेत रस काय? हे कोल्हापूरच्या जनतेला माहिती असून नवरात्रौत्सव अजून लांब असताना एवढ्या घाई गडबडीने कारवाई कशासाठी? जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाचा अपमान केला असून अशासकीय मंडळाने आपल्या नेत्यांच्या तोंडावर राजीनामे फेकून लढ्यात उतरावे.
दिलीप पोवार म्हणाले, इतके वर्ष नवरात्रौत्सव शांततेत होत असताना आताच दंगल होईल, अशी भीती जिल्हाधिकाऱ्यांना का वाटते? उत्सवातील गर्दी नियंत्रणात ठेवण्यात अपयश येत असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. मनमानीपणे कारवाई करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा.शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, रात्री दहाच्या पुढे कार्यालयात बसून पालकमंत्र्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांनी संघाच्या सभासदांशी खेळू नये, अन्यथा महागात पडेल. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, संघाच्या ‘बैला’ने अनेकांचे संसार उभे केले, पण तो अशक्त असताना त्याला मारण्याची कोणी भूमिका घेत असेल तर ते खपवून घेणार नाही. दर्शनमंडपाच्या आडून पालकमंत्र्यांना येथे आलिशान हॉटेल करायचे आहे.अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई म्हणाले, या लढाईत आम्ही सभासदांसोबत असून कोणाच्याही दबावाला भीक घालणार नाही. उद्या, बुधवारी सकाळी दहा वाजता भवानी मंडपातून मोर्चा काढला जाणार असून यामध्ये लोकप्रतिनिधींसह सभासद, कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह सहभागी व्हावे.मंडलिकसाहेब उघड भूमिका घ्या....
स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक संघावर प्रशासक असताना भवानी मंडपातील इमारत खरेदी केली. आता ही इमारत गिळंकृत होत असताना खासदार संजय मंडलिक तुम्ही बघत बसणार का? उघड भूमिका घ्या, असे आवाहन अनिल घाटगे यांनी केले.‘लोकमत’चे अभिनंदन..भवानी मंडपातील प्रत्येक वास्तूशी राजर्षी शाहू महाराज यांचे नाते आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडली असून ‘लोकमत’सह सावंत यांचेही अभिनंदनाचा ठराव विजय देवणे यांनी मांडला.
आमदार, खासदारांनी डबल ढोलकी बंद करावी
संघाच्या जिवावर ज्यांनी जिल्ह्याचे राजकारण केले. आमदार, खासदार पदे उपभोगली ते कोठे आहेत? त्यांनी डबल ढोलकी वाजवणे बंद करून ४० हजार सभासदांच्या बाजूने उभे राहावे, अन्यथा हेच सभासद त्यांना पायाखाली घेतील, असा इशारा संजय पवार यांनी दिला.शिंदेसाहेब हेच तुमचं ‘गतिमान सरकार का?एकाच दिवशी आदेश काढून तत्काळ ताबा घेतला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हेच तुमचं गतिमान सरकार का? असा सवाल करत पालकमंत्र्यांना खुश करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले. आता खालचे मजले घेतले उद्या सगळी इमारत ताब्यात घेतल्यानंतर हातात काहीच राहणार नाही, रस्त्यावरील लढाईसह कायदेशीर लढाईला तयार राहा, असे आवाहन ॲड. बाबा इंदुलकर यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा शेतकरी संघ व ‘मॅग्नेट’ बझार यांच्यात भाड्याचा वाद उच्च न्यायालयात असून, न्यायालयाने लवाद नेमला आहे. लवादाने बझारची सील केलेली जागा जिल्हाधिकाऱ्यांनी कुलुपे तोडून ताब्यात घेतली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे व मंडळ अधिकारी संतोष पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, आशी मागणी संघ व्यवस्थापनाने सोमवारी जुना राजवाडा पोलिसाकडे केली.जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईविरोधात संघाने सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मॅग्नेटही न्यायालयात जाणार असल्याचे समजते. यावेळी संघाचे अशासकीय मंडळाचे सदस्य जयवंत पाटील, ॲड. अशोकराव साळोखे, व्यंकाप्पा भोसले, संभाजीराव जगदाळे, रवींद्र जाधव, विजयराव पोळ, आकाराम पाटील, संभाजी पोवार संघाचे कार्यकारी संचालक सचिन सरनोबत, कर्मचारी संघटनेचे दीपक निंबाळकर, अनंत देसाई आदी उपस्थित होते.