कोल्हापूर : स्मार्टफोन, मोबाइल आल्यापासून अनेकांची तोंडी आकडेमोड, मोबाइल आणि दूरध्वनी नंबर लक्षात ठेवण्याची सवय मोडली आहे. मात्र, आपल्या आयुष्यातील ‘व्हॅलेंटाइन’चा मोबाइलनंबर मात्र, बहुतांश जणांना तोंडपाठ आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने रविवारी कोल्हापुरात एक छोटासा सर्व्हे केला. त्यात दहापैकी आठ जणांना त्यांच्या व्हॅलेंटाइनचा मोबाईल नंबर पाठ असल्याचे दिसून आले.सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाजातील प्रत्येक घटकांतील अनेकांकडे स्मार्ट फोन आहेत. रोज विविध स्वरूपांतील आकडेमोड करणे, वेळ जाणून घेणे, मोबाइल अथवा दूरध्वनी क्रमांक नोंद करून ठेवण्यासाठी सर्रासपणे स्मार्ट फोनचा वापर केला जात आहे. त्यामुळे बहुतांश जण त्यांच्या संपर्कात असणाऱ्या अधिकतर जणांचे मोबाइल नंबर पाठ करण्याऐवजी सेव्ह करून ठेवतात. या स्थितीत आपल्या ‘व्हॅलेंटाइन’चा मोबाइल नंबर मात्र, अनेकांना अगदी तोंडपाठ आहेत.
‘लोकमत’ जनता बझार चौकात
राजारामपुरीतील जनता बझार चौकात ‘लोकमत’ने मोबाइल नंबर तोंडपाठाबाबतचा छोटासा सर्व्हे केला. काही युवक-युवतींशी मोबाइलवरून संपर्क साधण्यात आला. त्यातील दहापैकी आठ जणांनी मोबाइल नंबर तोंडपाठ असल्याचे सांगितले. अवघ्या काही सेकंदात त्यांनी नंबरही सांगितला. एका ३० वर्षीय तरुणाने मोबाइल नंबरमधील शेवटचे दोन अंक आठवत नाहीत, पण स्मार्ट फोनच्या कॉन्टॅक्टमध्ये ‘फेव्हरेट’ म्हणून नंबर सेव्ह असल्याचे सांगितले. दुसऱ्या एका २६ वर्षीय युवकाने नंबर पाठ नसल्याचे सांगितले.आम्ही कोणाला हे प्रश्न विचारले?वय वर्षे २६ ते ३६ वयोगटांतील दहा जणांना मोबाइल नंबर तोंडपाठबाबत ‘लोकमत’ने विचारणा केली. त्यात पाच पुरुष, तर पाच महिला होत्या. व्यावसायिक, नोकरदार, इंजिनीअर, इव्हेंट व्यवस्थापक या क्षेत्रातील पुरुष होते. गृहिणी, नोकरदार, आर्किटेक्ट, झुंबा प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या महिला होत्या.
आई-वडील, बेस्ट फ्रेंडचा नंबर पाठ
या सर्व दहा जणांना त्यांचे आई-वडील, बेस्ट फ्रेंडचा नंबर तोंडपाठ आहे. त्यांनी अगदी शाळेपासून असलेल्या मित्र-मैत्रिणींचे नंबर सांगितले.
स्मार्ट फोनमधील डाटा स्टोरेज करून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याने मोबाइल नंबर त्यामध्ये सेव्ह केला जातो. काहींना नंबर पाठ करण्याची गरज वाटत नाही. मात्र, ज्यांना मोबाइलनंबर तोंडपाठ आहेत. त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे. - डॉ.निखिल चौगुले, मानसोपचार तज्ज्ञ