कोल्हापूर : ग्रामविकास विभागाने जाहीर केलेली आरोग्य विभागाची भरती पुन्हा लांबणीवर पडणार आहे. अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने १५ व १६ आक्टोंबर रोजी होणाऱ्या या परीक्षा पुन्हा पुढे जाणार असून नव्याने वेळापत्रक जाहीर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.मार्च २०१९ च्या महाभरतीअंतर्गत ग्रामविकास विभागाकडील आरोग्य विभागाच्या जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गाच्या पदभरतीसाठी राज्यभरातून सव्वा लाख अर्ज आले होते. परंतू याआधीची प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे खासगी कंपनीकडून करण्यात येणारी ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.गेल्याच आठवड्यात या भरतीला पुन्हा मान्यता देत २७ ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू करून १५ व १६ आक्टोंबर रोजी परीक्षा घेण्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. परंतू त्यावेळी अर्ज केलेले अनेकजण आता वयोमर्यादा उलटून गेले आहेत, काही गटांच्या आरक्षणाचाही प्रश्न आहे. त्यामुळे ही परीक्षाही पुढे जाणार असून लवकरच नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदे भरली जाणार आहेत.
आरोग्य विभागाची भरती पुन्हा लांबणीवर पडणार, अनेक तांत्रिक अडचणी
By समीर देशपांडे | Published: September 15, 2022 6:24 PM