कोल्हापूर : वाडी रत्नागिरी येथील जैवविविधतेला कोठेही बाधा येणार नाही, याची काळजी घेत जोतिबा मंदिर विकास आराखडा राबवा, आराखड्यामध्ये वन विभागाची महत्त्वाची भूमिका असून त्यांनी स्वयंस्फूर्तीने यात सहभाग घ्यावा, अधिकाधिक वृक्ष लागवड करावी, यासह संबंधित सर्व विभागांनी आपापल्या कामांची विभागणी करून आराखड्याचे सादरीकरण करावे, अशी सूचना शुक्रवारी वित्त विभागाने केली.जोतिबा मंदिराच्या १८०० कोटींच्या आराखड्याचे सादरीकरण मुंबईत मुख्य सचिव नितीन करीर, अप्पर मुख्य वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता, अर्थ विभागाचे प्रधान सचिव तथा कोल्हापूरचे पालक सचिव राजगोपाल देवरा, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासमोर झाले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अभियंता सुयश पाटील उपस्थित होते.
जोतिबा डोंगर परिसर जैवविविधतेने नटलेला असताना आराखड्यामुळे त्यात बाधा येऊ नये, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात यावी, पायवाटा मजबुतीकरणाला प्राधान्य द्या, विकासकामे करताना वास्तू व परिसराचे महत्त्व, हेरिटेज लूक कायम ठेवा, वन विभागाने यासाठी पुढाकार घेऊन डोंगराचा परिसर वनीकरणाखाली घ्यावी, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांसंदर्भातील जबाबदारी घ्यावी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हजारो एकर जागा आहे. डोंगर परिसरात कोणकोणत्या ठिकाणी जागा आहेत, याचा शोध घ्यावा अशी सूचना विभागाने केली.सुचवलेल्या दुरुस्त्यांचा अंतर्भाव करून विभागनिहाय आराखड्याची विभागणी करून तो पुन्हा सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र बैठक घेतली जाईल. आराखडा बनवलेल्या आर्ट ॲन्ड स्पेस स्टुडिओचे संतोष रामाणे व अभिनंदन मगदुम यांनी सादरीकरण केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आराखड्याची आवश्यकता विशद केली. शिवराज नाईकवाडे यांनी डोंगराची भौगोलिक परिस्थिती, अडचणी, उत्पन्नाचे स्रोत यासह मंदिराची माहिती दिली.
पहिल्या टप्प्यातील विकासकामे-दक्षिण दिग्विजयोत्सव मैदान, दुकानगाळे, खुला रंगमंच, नवे तळे येथे ज्योतिर्लिंग प्रतिकृती, अन्नछत्र, ध्यानधारणा केंद्र, केदारविजय उद्यान, दर्शन रांग, सुविधा केंद्र, वाहनतळ, माहिती केंद्र, तलाव व मंदिरातील सुधारणा.