अमोल शिंगे
कोल्हापूर - संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील शारदीय उत्सवाला आजपासून धार्मिक वातावरणात सुरवात झाली. नवरात्रीतील आज पहिल्याच दिवशी सुमारे 50 हजार भाविकांनी श्री जोतिबाचे दर्शन घेतले. आज पहाटे चार वाजता घंटानाद होऊन मंदिरातील नित्य धार्मिक विधी पार पडल्या. श्रींच्या अभिषेकानंतर श्री जोतिबाची पानांच्या विड्यातील दख्खनचा राजा स्वरूपातील पूजा बांधण्यात आली होती.
सकाळी 9:30 वाजता धुपारती सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यातुन गावातील सर्व ग्रामदैवतांच्या घटस्थापना करण्यात आल्या. यावेळी सुहासिनी महिलांनी धुपारती सोहळ्यात सहभागी झालेल्या श्रींच्या पुजाऱ्यांच्या पायावर पाणी घालून औक्षण केले. या धुपारती सोहळ्यावेळी श्रींचे पुजारी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, गावातील मानकरी आणि सर्व देवसेवक उपस्थित होते. आज भाविकांनी श्री जोतिबाल तेल वाहून कडाकण्याचा आणि ऊसाचा प्रसाद अर्पण केला. कोडोली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर आणि परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.