कोल्हापूर : पायलटची ड्युटीची वेळ संपल्याने पुढे घेऊन जाण्यास चालक नसल्याने कोल्हापूर-बंगळुरू हे विमानच रद्द करावे लागल्याचा प्रकार सोमवारी घडला. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मंगळवारी सकाळी संबंधित विमान कंपनीने दुसऱ्या पायलटच्या मदतीने हे विमान बंगळुरूला नेले.मुंबईहून कोल्हापूरला येणारे विमान पुढे पाच वाजता बंगळुरूला जाते. मात्र, मुंबईत झालेल्या वादळामुळे या विमानाला कोल्हापुरात येण्यास तासभर उशिर झाला. त्यात संबंधित विमानाच्या पायलटची ड्युटी संपल्याने त्याला हे विमान पुढे घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली. हे विमान पुढे घेऊन जाण्यास संबंधित विमान कंपनीकडे पायलटच नसल्याने हे विमान अचानक रद्द करण्यात आले.कोल्हापूर विमानतळावरून सायंकाळी ४:५५ वाजता हे विमान बंगळुरूकडे जाणार होते. यामध्ये ५० च्या आसपास प्रवासी होते. हे प्रवासी दुपारी साडेतीन वाजल्यापासून विमानतळावर आले होते. मात्र, अचानक विमानच रद्द केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. मंगळवारी सकाळी हे विमान दुसऱ्या पायलटच्या मदतीने बंगळुरूला पोहोचवण्यात आले.असे पहिल्यांदाच घडलेचालकाची ड्युटीची वेळ संपल्याने थेट विमानच रद्द होण्याची पहिलीच वेळ असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. संबंधित विमान कंपनीने नियमावर बोट ठेवून ही कृती केली असली तरी प्रवाशांना झालेल्या मनस्तापाला कोण जबाबदार, याचे उत्तर कंपनीकडे नाही.
Kolhapur: पायलटची ड्यूटी संपली, कंपनीने विमानच केले रद्द; प्रवाशांचे अतोनात हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 3:52 PM