विश्वास पाटील, उपवृत्त संपादक, लोकमत, कोल्हापूरकोल्हापूरचे राजकारण अलीकडील काही वर्षांत कोणत्या दिशेने जाणार, याबद्दलचे द्वंद्व सातत्याने सुरू होते. परंतु विधानसभेच्या या निवडणुकीत या द्वंद्वात अखेर हिंदुत्ववादी विचारांचीच सरशी झाली. एखाद्या विचारांची, एखाद्याच्या मृत्यूनंतर सहानुभूतीची लाट जेव्हा तयार होते तेव्हाच एवढा सुपडासाफ होतो, त्याचेच प्रत्यंतर या निकालानंतर आले आहे. हा एकट्या लाडक्या बहिणींचा विजय नाही. त्याची पूरक मदत झाली; परंतु त्यामुळे एवढे अभूतपूर्व यश मिळणे शक्यच नव्हते. हिंदुत्ववादी विचारांचे धुव्रीकरण सुरू असताना ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना कधी कळलेच नाही. देव, देश आणि धर्म वाचवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करावे लागते, ही भावना त्यांनी लोकांच्या मनामनांत पेरली आणि त्यामुळेच एवढा एकतर्फी विजय साकारल्याचे चित्र कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात दिसत आहे. कोणत्याही जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या निकालातील हे सर्वात मोठे साम्य आहे. त्यामुळेच जे राज्यात घडले तेच कोल्हापुरातही घडले आहे.
कोल्हापूर हा महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा जिल्हा मानला गेला. कोल्हापुरात जे घडते, त्याचे प्रतिबिंब महाराष्ट्रात उमटते. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून समृद्ध झालेला हा जिल्हा. त्यामुळे त्याने कधीच जातीपातीचे, धर्माधर्माचे राजकारण केले नाही. म्हणून तर ज्या समाजाचे पाच-पंचवीस हजारांचेही मतदान नाही, अशा समाजातील हसन मुश्रीफ यांना कागलच्या जनतेने तब्बल सहा वेळा निवडून दिले. कोल्हापूरच्या समाजजीवनाची हीच मुख्य धारा व तितकीच मजबूत वीण होती. ती पद्धतशीर प्रयत्न करून तोडण्यात उजव्या विचारांच्या शक्तींना यश आल्यामुळेच एवढे मोठे यश महायुतीला मिळाले आहे.अशी जेव्हा एखादी लाट तयार होते, तेव्हा लोक अन्य कशाचाच विचार करत नाहीत. त्यामुळेच या निवडणुकीत उमेदवारांचे चारित्र्य. त्यांची कामे, कोल्हापूरचे प्रश्न हे मुद्दे फारसे चर्चेत आलेच नाहीत. आपल्याला धर्म वाचवायचा आहे आणि त्यासाठी या उमेदवारांना विजयी केले पाहिजे, या भावनेतून मतदान झाले. मतटक्का वाढण्यामागेही तेच कारण महत्त्वाचे ठरले.कोल्हापुरात २०२२ मध्ये झालेल्या उत्तरच्या पोटनिवडणुकीतही भाजपने ही निवडणूक हिंदुत्वाच्या दिशेने नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. असा प्रयत्न कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कधीच झाला नव्हता. परंतु त्यावेळी काँग्रेसने सर्व पुरोगामी पक्षांची, विचारधारांची, कार्यकर्त्यांची मोट बांधून तिला यशस्वी तोंड दिले आणि विजय खेचून आणला. परंतु या निवडणुकीत तसे घडले नाही. त्यालाही काही महत्त्वाची कारणे आहेत.भाजपचे सरकार केंद्रात आल्यापासून सातत्याने एक प्रवाह मुसलमानांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारची मांडणी करत आला आहे. देशाच्याच नव्हे तर जगाच्या दुसऱ्या टोकाला मुस्लीम समाजाविषयी काही घडले असेल तर त्याचे व्हिडीओ, पोस्ट गावागावांतील सोशल मीडिया ग्रुपवर रोज व्हायरल होत आहेत. ज्या गावात मुसलमानांचे एकही घर नाही, तिथेही सकाळी उठल्यापासून अशा पोस्ट शेअर होत आहेत. त्यातून तरुणाईच्या मनांत मोठी दरी निर्माण होत आहे. ती व्हावी असेच प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. परंतु त्याला रोखण्याचे काम कोणत्याच घटकांकडून केले जात नाही. काँग्रेससह कोणत्याचा पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या, पक्षांच्या हा विषय खिसगणतीतही नाही. डावे अगोदरच विकलांग झाले आहेत. त्यामुळे उजवी विचारधारा अधिक बळकट होताना दिसत आहे. विधानसभेचा निकाल हे त्याचे प्रतिबिंब आहे.
लोकसभेला दलित-मुस्लीम आणि मुख्यत: मराठा समाज महाविकास आघाडीच्या मागे ताकदीने एकवटला. त्यामुळे त्यांना ३३ जागा मिळाल्या. परंतु हे तिन्ही घटक या निवडणुकीत महाविकास आघाडीची साथ सोडून गेले. लोकसभेला आम्ही एवढी ताकद दिली आणि बोटावरील शाई वाळण्याच्यापूर्वीच विशाळगड प्रकरण घडले. छत्रपती घराण्याच्या वारसांनी पुढाकार घ्यावा आणि धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करावे, ही जखम मुस्लीम समाजाच्या जिव्हारी लागली.मधुरिमाराजे यांच्या माघारीमागेही हे एक महत्त्वाचे कारण होते. शिवाय हिंदू-मुस्लीम असे काही प्रकरण घडल्यावर आपण मुस्लीम समाजाची बाजू घेतल्यास इतर समाज विरोधात जाईल, अशी भीती बाळगून काँग्रेससह महाविकास आघाडीतील पक्ष नरो वा कुंजरोवा, अशी भूमिका घेत राहिले. म्हणजे मतांसाठी तुम्हाला मुस्लीम हवेत आणि त्यांना सोबत घेण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही अंग चोरून घेता, असाच अनुभव या समाजाला सातत्याने आला आहे.संविधान बदलाच्या नरेटिव्हमुळे महाविकास आघाडीच्या मागे एकवटलेला दलित समाज तो कायम राहावा, यासाठी त्यांना विश्वास, सत्तेतील संधी देण्याचे काम महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून झाले नाही. हा समाजही आता पुढारलेला आहे. तरुण पिढी शिक्षित झाली आहे. त्यांनाही काही आशा-आकांक्षा आहेत, तो विचारी आहे. त्याला गृहीत धरून अरे कुठं जातात दलित, ते तर आपलेच या भ्रमात राहिल्याने तो बाजूला गेला. जरांगे फॅक्टरमुळे मराठा समाज लोकसभेला महाविकास आघाडीच्या मागे एकवटला. त्याचा परिणाम म्हणून विधानसभेला ओबीसी समाज ताकदीने महायुतीच्या मागे उभा राहिला आणि मराठा समाजही बाजूला गेला. असे समाजघटक जोडण्याचे काम महाविकास आघाडीकडून अजिबातच झाले नाही, त्याचा फटका बसला.
महाविकास आघाडी सुरुवातीपासूनच चाचपडतजिल्ह्याच्या पातळीवर आघाडीत एकवाक्यता नव्हती. कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव यांना पुन्हा संधी द्यायची नव्हती, तर दोन वर्षांत जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना पर्यायी उमेदवार उभा करता याला नाही. जे संभाव्य इच्छुक होते, त्यांच्यातही एकवाक्यता करता आली नाही. अचानक माघारीमुळे जे घडले त्यात पक्ष ऐन निवडणुकीत पक्षाची पीछेहाट झाली. ही निवडणूक त्यातून बाहेरच आली नाही. माजी नगरसेवक सोबत आहेत म्हणजे लोक आहेत या भ्रमाचा फुगा निकालात फुटल्याचे दिसून आले.
पॅचअप करण्यात आघाडीचे नेते पडले कमी
- चंदगडला नंदिनी बाभूळकर यांच्या उमेदवारीस तीव्र विरोध असतानाच त्यांनाच ती देण्यात आली. तिथे काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्याचे काम झालेच नाही.
- राधानगरीतही के.पी. पाटील, ए.वाय. पाटील यांची दरी मिटवण्याचे प्रयत्न झाले नाहीत.
- स्वाभिमानीचे नेेते राजू शेट्टी यांना राज्यपातळीवरच सोबत घ्यावे, असे प्रयत्न होते; परंतु त्यांना कुणीच दाद दिली नाही. त्याचा फटका कोल्हापुरातील दोन-तीन जागांना बसला.
- उद्धवसेनेचे संजय पवार, विजय देवणे हे भाषणे करत सुटले; परंतु त्यांना सच्चा शिवसैनिक सोबत घेता आला नाही. शरद पवार पक्षाची मुळातच चिमूटभर ताकद; परंतु त्यांचे नेतेही हेवेदावे करत बसले. ३३ गुणिले ६ या मस्तीत राहिल्यानेच महाविकास आघाडीची धुळदाण उडाली. लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडी सर्वांना सोबत घेऊन लढली नाही. यामुळेच त्यांचा नामुष्कीजनक पराभव झाला हेच अंतिम सत्य..