सोळांकुर : सिंचन व्यवस्थेवर कोणताही परिणाम न होऊ देता काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीच्या गळती दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. धरणातील पाणी पातळी कमी होत जाईल तशी दुरुस्ती प्रक्रियाही टप्प्याटप्प्याने सुरू राहील. कामांचा जोर. असाच राहिल्यास पावसाळ्यापूर्वीच सुमारे ५० टक्के काम पूर्ण होईल, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्राकडून कळते.
धरणाच्या मुख्य भिंतीच्या गळतीचा प्रश्न गंभीर बनला होता. गळतीचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाणीसाठा ही कमी करण्यात आला होता. डिसेंबर २०२४ रोजी आलेल्या तज्ञ समितीच्या भेटीनंतर जानेवारीत संक्रांती नंतर कामाला सुरुवात झाली आहे. गळती रोखण्यासाठी धरणाच्या मुख्य भिंतीला नऊ मोनोलीथमध्ये एकूण १३८ छिद्रे घेण्यात आली असून, त्याद्वारे ग्राऊटिंग प्रक्रिया सुरू आहे. मुख्य भिंतीवरून बारा मीटरने होल मारून पूर्ण झाले आहेत. धरणातील पाणी जसे जसे कमी होत जाईल तशी दुरुस्ती प्रक्रियाही टप्प्याटप्प्याने वेगाने सुरू राहणार आहे.
गळतीच्या दुरुस्तीचे काम तज्ज्ञांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सध्या धरणात ६० टक्के साठा म्हणजे १४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंचनासाठी आवश्यक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदा धरणातील पाणी कमी झाल्यास पावसाळ्यापूर्वीच सुमारे ५० टक्के काम पूर्ण होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. गळती काढत असताना सिंचन व्यवस्थेवर कोणताही परिणाम होऊ नये, याचीही विशेष काळजी घेतली जात आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.