समीर देशपांडेकोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील भाऊसाे धोंडिराम कांबळे (वय ७२) हे जिवंत असताना मयत दाखवण्याची किमया येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ‘सीपीआर’ने करून दाखवली आहे. एवढेच नाही तर चौकशी अहवालात रुग्णालयाचे नावच बदलून टाकले आहे. येथील एका प्रसिद्ध डॉक्टरांना वाचवण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांकडून होत आहे.कांबळे यांची येथील मगदूम हॉस्पिटलमध्ये नोव्हेंबर २०२० पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ही शस्त्रक्रिया झाली असतानाही जादा पैसे घेतले, उपचारात हलगर्जीपणा केला म्हणून त्यांचा मुलगा विजय दिवाण यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यानुसार हा अर्ज राजारामपुरी पोलीस ठाण्यात आला.पोलिसांनी यावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र लिहून उपचाराबाबत अहवाल मिळावा, असे लेखी पत्र ३ सप्टेंबर २०२१ रोजी दिले. याचदरम्यान जनआरोग्य योजना, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, लोकआयुक्त या सर्वांना निवेदने दिली.दरम्यान, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पत्राला वैद्यकीय महाविद्यालयाच्या तत्कालीन वैद्यकीय अधीक्षकांनी लेखी उत्तर दिले. मात्र, हे उत्तर देताना त्याठिकाणी मगदूम हॉस्पिटलऐवजी चक्क हुक्कीरे मॅटर्निटी ॲण्ड सर्जिकल हॉस्पिटल, कुरुंदवाड यांचे नाव समाविष्ट केले. यावर कळस म्हणजे भाऊसाे कांबळे यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान आणि उपचारात हलगर्जीपणा झाला नसल्याचेही नमूद केले. म्हणजेच जिवंत माणसाला कागदोपत्री मयत करण्याचा पराक्रम सीपीआरने करून दाखवला आहे.हॉस्पिटलचे नाव का बदललेदिवाण यांनी ज्या हॉस्पिटलबाबत लेखी तक्रार केली होती. त्या हॉस्पिटलऐवजी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील रुग्णालयाचे नाव समाविष्ट करण्याची उत्तम कल्पना सीपीआरमधील नेमक्या कोणा तज्ज्ञाच्या डोक्यात आली याची शहानिशा होण्याची गरज आहे. दबावाखाली येऊन अहवाल लिहिला की, मग असे घोटाळे करण्याची बुद्धी होते, याचेच हे प्रत्यंतर आहे.
कांबळे मयत झाले याला पुरावा कायभाऊसो कांबळे जिवंत आहेत. ते पत्रकार परिषदेतही हजर होते. त्यांची तब्येत ठीक आहे; परंतु २९ डिसेंबर २०२१ च्या अहवालात सीपीआरने त्यांना मयत घोषित केले आहेत. ते जिवंत असल्याचे स्पष्ट करूनही दोन महिने होत आले तरी ते मयत झालेले नाहीत, असा खुलासा करायला सीपीआरला वेळ का लागतो, हा खरा प्रश्न आहे. मग सीपीआरने असे कोणते पुरावे पाहिले आणि कांबळे यांना मयत घोषित केले हे समोर येणे आवश्यक आहे.हॉस्पिटल दोषी
मगदूम इंडो सर्जरी हॉस्पिटलविरोधात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा संनियंत्रण आणि तक्रार निवारण समितीने चौकशी केल्यानंतर माेफत उपचार देण्याचे असतानाही ६.०६६ रुपये जादा घेतल्याने हे हॉस्पिटल दोषी आढळले आहेत, असे जनआरोग्य योजनेच्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.