कोल्हापूर : बसने कोल्हापूर जिल्ह्यात येऊन बंद घरांचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या कर्नाटकातील दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. विक्रम उर्फ राजू बाळू कित्तूरकर (वय ३१) आणि महादेव नारायण धामणीकर (३५, दोघे रा. हालशी, ता. खानापूर, जि. बेळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. त्यांच्या चौकशीत कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण १४ गुन्ह्यांची उकल झाली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील १ किलो २०० ग्रॅम सोन्याचे दागिने, १ किलो ४३० ग्रॅम चांदीचे दागिने, लाखाची रोकड आणि दोन दुचाकी असा सुमारे एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला.पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ महिन्यांपूर्वी सीमा भागात दिवसा बंद घरे फोडून चोरीचे प्रकार वाढले होते. गुन्ह्यांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या पथकाला एका संशयिताचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यावरून शोध घेतला असता, संशयित चोरटा कर्नाटकातील असल्याची माहिती मिळाली.संशयित विक्रम कित्तूरकर याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर त्याने साथीदार महादेव धामणीकर याच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली. धामणीकर हा चोरीच्या गुन्ह्यात बेळगाव पोलिसांच्या अटकेत होता. त्याचा ताबा घेण्यात आला. या दोघांनी कोडोली, चंदगड, मुरगुड, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, पेठ वडगाव, राधानगरी आणि इस्लामपूर येथील बंद घरे फोडून सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केले आहेत.चोरट्यांनी यातील काही दागिने खानापूर येथील फेडरल बँक आणि मुथुट फिनकॉर्प येथे तारण ठेवून कर्ज घेतले होते. सुमारे ७०० ग्रॅम दागिने त्यांनी घरात लपवले होते. पोलिसांनी घरझडतीत दागिने जप्त केले. तसेच, बँक आणि मुथुट फिनकॉर्पमधील दागिने हस्तगत केले. त्यांच्याकडून घरफोड्यांचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस अधीक्षक पंडित यांनी वर्तवली.गवंडी कामाला येऊन रेकीदोन्ही चोरट्यांचा गवंडी कामाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात वावर होता. ते बसने कोल्हापुरात येऊन दुचाकीची चोरी करायचे. त्यानंतर चोरी करून सीमाभागात दुचाकी सोडून पुन्हा बसने गावाकडे जायचे. यांच्यावर कर्नाटकात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
Kolhapur: गवंडी कामाला येऊन रेकी; दोन चोरट्यांकडून सोने, चांदीसह सुमारे एक कोटीचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 12:43 PM