कागल : शाहू - फुले - आंबेडकर यांचे विचार सोडून काही लोक जातात तेव्हा त्यांच्या विरोधात बहुजन समाज कसा एकवटतो, हे छत्रपती शाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरने दाखवले आहे. आता लोकसभेचीच पुनरावृत्ती येत्या नोव्हेंबर महिन्यात कागलमध्ये होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. समरजित घाटगे यांचा हा पक्ष प्रवेश महाराष्ट्र विधानसभेचे चित्र बदलणारा ठरेल, नवा इतिहास घडविण्यासाठी सज्ज राहा, असेही आमदार पाटील म्हणाले.पक्ष प्रवेशाबद्दल भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आ. पाटील हे तातडीने मुंबईहून कागलला आले. यावेळी प्रवीणसिह घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आर. के. पोवार, अनिल घाटगे, वीरकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. येत्या तीन सप्टेंबरला शरद पवार हे पक्ष प्रवेशासाठी स्वतः कागलमध्ये येत असल्याचे आ. पाटील यांनी जाहीर केले. समरजित घाटगे म्हणाले, २०१९मध्ये पराभव होणार हे माहीत असूनही २०२४च्या विजयासाठी लढलो आहे. आज या मतदारसंघातील सर्व नेते एका बाजुला आहेत. त्यामुळे मला शरद पवार यांची आणि पक्षाची ताकद लागणार आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांचेही भाषण झाले. स्वागत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी, तर सुनील मगदुम यांनी आभार मानले.
टप्प्यात आल्यावर लगेचच कार्यक्रमवस्तादाने एक डाव शिल्लक ठेवलेला असतो. त्याची प्रचिती कागलमध्ये आणूया. समरजित घाटगे यांचा फोन आला. भेटीची वेळ कधी देता म्हणाले. तेव्हा उद्या - परवा कशाला, आजच येतो. म्हणून तातडीने आलो. टप्प्यात आल्यावर आम्ही लगेच कार्यक्रम करतो.