कोल्हापूर : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुणे येथे दि. ११ ते १५ जानेवारीदरम्यान होणार आहे. या स्पर्धेच्या संयोजनाबाबतचे पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण सिंग यांनी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना शुक्रवारी दिले.स्पर्धा पुणे येथे होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दि. १२ सप्टेंबर रोजीच्या अंकात दिले होते. यंदाची स्पर्धा डिसेंबरअखेर घेण्याबाबतचे पत्र राज्य कुस्तीगीर परिषद प्रस्ताव समितीचे अध्यक्ष संजय सिंग यांनी पुण्याचे माजी महापौर मोहोळ यांना सप्टेंबरमध्ये सुपुर्द केले होते. त्यानंतर आता त्यांना भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण सिंग यांनीही स्पर्धा संयोजनाचे पत्र दिले. यावेळी खासदार रामदास तडस, संदीप भोंडवे, हिंदकेसरी योगेश दोडके उपस्थित होते.महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू झाल्यापासून १९७० मध्ये पहिल्यांदा स्पर्धा संयोजन करण्याचा मान पुण्याला मिळाला होता. त्यानंतर सन १९८३, १९९३, १९९७-९८, इंदापूर (२००४-०५), बारामती (२००४-०५), भोसरी (२०१३), वारजे (२०१६), म्हाळुंगे-बालेवाडी(२०१९) आणि यंदा २०२२ करिता पुन्हा पुण्याला मान मिळत आहे.कुस्तीगीर परिषदेची बुधवारी बैठकआमदार संग्राम जगताप यांनी गेल्या दीड महिन्यापूर्वी अहमदनगर येथे यावर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाबाबचे पत्रक कुस्तीगीर परिषदेला दिले. त्यावर परिषदेच्या एका समितीने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. आता पुणे येथे स्पर्धा संयोजनाचे पत्र महासंघाने दिले. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी परिषदेचे चीफ पेट्रन शरद पवार यांच्या सूचनेनुसार बुधवारी (दि. १४) पुणे येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे.
पुण्यात भरणार ‘महाराष्ट्र केसरी’चे मैदान, स्पर्धा संयोजनाचा दहाव्यांदा मान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 1:43 PM