निपाणी : बेळगाव सीमा भागातील ८६५ गावांवर महाराष्ट्र शासनाने दावा दाखल करून या संपूर्ण गावांचे पालकत्व घेण्याची घोषणा केली होती. बेळगावचा मराठी भाषक प्रदेश आमचाच आहे आणि येथील नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशा घोषणा महाराष्ट्रातील नेते वारंवार करत असतात; पण येथील विद्यार्थ्यांवर मात्र महाराष्ट्राकडून नेहमीच अन्याय होत असल्याचे दिसत आले आहे. याची पुन्हा प्रचीती गुरुवारी आली. कोडणी तालुका निपाणी येथील विद्यार्थी सनमकुमार पंडित माने यांंना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व, मुख्य व शारीरिक चाचणी या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात आले. या निर्णयाने सीमा भागातील मराठी भाषकांत नाराजी पसरली आहे.२०२० साली वृत्तपत्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. जाहिरातीमध्ये कारवार, बीदर व बेळगाव या जिल्ह्यांतील परीक्षार्थी जात प्रवर्गासहित अर्ज दाखल करू शकत होते. यानुसार सनमकुमार माने यांनी मागास प्रवर्गातून अर्ज केला. आयोगाची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गुरुवार दिनांक ९ मार्च रोजी त्यांना यशदा पुणे येथे मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते; पण याठिकाणी कागदपत्रांची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्याचा जातीचा दाखला नसल्याचे कारण सांगत सनमकुमार माने यांना मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात आले.
पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही अशा पद्धतीने सीमा भागातील विद्यार्थ्याला अपात्र ठरवणे हा सीमा भागातील विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा अन्याय असल्याची भावना मराठी भाषकांमधून व्यक्त होत आहे.