कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेची १५ हजार मते आहेत असे राजेश क्षीरसागर म्हणत असतील तर उत्तर विधानसभा मतदारसंघातही भाजपची ८० हजार मते आहेत, या शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना बुधवारी चांगलेच डिवचले. शहरातील दोन जागांवरून महायुतीतील नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर भाजपनेही दावा ठोकल्याने क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिणमध्ये कार्यकर्ता मेळावा घेत 'उत्तर'चा आमदार शिवसेनेचा असेल, मात्र 'दक्षिण'मध्येही आमची दहा-पंधरा हजार मते असून तेथील आमदारही शिवसेना ठरवेल असे सांगत भाजपला जोरदार आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर खासदार महाडिक यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधत क्षीरसागर यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले.
महाडिक म्हणाले, उत्तर विधानसभा मतदारसंघावर भाजपने पहिल्यापासूनच दावा केला आहे. पोटनिवडणुकीत आम्ही ही जागा लढवली असून, ८० हजार मते घेतली आहेत. ते जर दक्षिणमध्ये आमची १५ हजार मते आहेत असे म्हणत असतील, तर आमची उत्तरमध्ये ८० हजार मते आहेत. एकमेकांना सोबत घेऊन गेलो तरच आपण जागा निवडून आणू शकतो, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी क्षीरसागर यांना दिला.मेळावा दबाव टाकण्यासाठी नकोक्षीरसागर यांनी कोणावर दबाव टाकण्यासाठी मेळावा घेऊ नये. निवडणुकीच्या तोंडावर गैरसमज होणारे मेळावे होऊ नयेत, असा टोलाही महाडिक यांनी लगावला.'उत्तर'चा नेमका वाद काय ?कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेनेने पाचवेळा भगवा फडकवला आहे. त्यामुळे ही जागा आपल्याला मिळावी अशी मागणी शिंदेसेनेकडून करण्यात येत आहे, तर २०२२ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-भाजपमध्ये झालेल्या थेट लढतीत भाजप उमेदवाराने ८० हजार मते घेतल्याने आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने या जागेवर प्रबळ दावा सांगितला आहे. त्यात महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज यांनी संधी मिळाल्यास लढणार असल्याचे जाहीर केल्याने क्षीरसागर अस्वस्थ झाले आहेत. या जागेवरून महायुतीमधील दोन प्रमुख पक्षांमध्येच धुसफूस वाढली आहे.