कोल्हापूर: सकल मराठा समाजातर्फे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या राज्यपाल रमेश बैस यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवसभरात दसरा चौकात कोल्हापूरातील डॉक्टरांनी आंदोलनस्थळाला भेट देउन मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, राज्यपाल दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याची भूमिका घेतल्यामुळे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलिस निरिक्षक तानाजी सावंत यांनी दसरा चौकात येउन मराठा आंदोलकांची भेट घेतली.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा आग्रह धरणाऱ्या छगन भुजबळ यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी उद्या, सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या राज्यपालांची भेट घेण्यासाठी सकल मराठा समाजाने मागितलेली वेळ नाकारल्यामुळे त्यांच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यकर्ते उद्या सकाळी, ९. ३० वाजता जयंती नाल्याजवळील खानविलकर पेट्रोल पंप येथे काळे कपडे घालून एकत्र येणार आहेत.
दिवसभरात डॉ. सुनील पाटील, डॉ. हरिष पाटील, डॉ. सुजित पाटील, डॉ. आदित्य काशिद, डॉ. रणजित चिकोडे यांनी भेट दिली. यावेळी डॉ. सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, राज्यपाल दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याची भूमिका घेतल्यामुळे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलिस निरिक्षक तानाजी सावंत यांनी दसरा चौकात येउन मराठा आंदोलकांची भेट घेतली.
राज्यपाल कोल्हापूरात प्रथमच येत असल्यामुळे निषेध आंदोलन त्यांच्यासमोर करु नये अशी विनंती त्यांनी केली. परंतु भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी ही मागणी राज्यपालांसमोर मांडण्यावर आंदोलक ठाम राहिले. यावेळी वसंत मुळीक, ॲड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, विजय देवणे, दिलिप देसाई, चंद्रकांत पाटील, उदय लाड, महादेव पाटील, सुनिता पाटील, माजी नगरसेवक प्रार्थना समर्थ उपस्थित होत्या.