कागल : आक्षेपार्ह स्टेटस लावलेल्या कागल येथील त्या तरुणाच्या वडिलांचे कागल मुस्लिम जमीयतचे सभासदत्व एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. येथील मुस्लिम समाजाने बैठक घेऊन हा एकमुखी निर्णय घेतलेला आहे. शांतता व सलोखा बिघडविल्या प्रकरणी मुस्लिम समाजाने ही कारवाई केली. कागलमधील तरुणाने आक्षेपार्ह स्टेटस लावल्यानंतर काल कागलमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करीत या तरुणाला ताब्यात घेतले, तसेच ठिकठिकाणी जमा होऊ लागलेल्या जमावाला पांगवले व परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
याप्रकरणी येथील मुस्लिम समाजाने कागल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी केली. यानंतर मुस्लिम समाजाने बैठक घेत संबंधित तरुणाच्या वडिलांचे सभासदत्व निलंबित करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. मुस्लिम समाजाच्या बैठकीत झालेला हा निर्णय नोटीसद्वारे संबंधिताच्या वडिलांना कळविला. या नोटिसीमध्ये म्हटले आहे, आपल्या मुलाने लावलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे कागल शहरात अशांतता निर्माण झाली. आपल्या दोन्हीही मुलांना सक्त ताकीद देऊन असे दुष्कृत्य परत होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही या नोटीसमध्ये दिले आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांच्या अशा चुकीच्या वागण्याने संपूर्ण समाज अडचणीत आला आहे. इतर समाजाशी असलेले सलोख्याचे संबंध बिघडत आहेत, याकडेही लक्ष वेधले.