कोल्हापूर : कोल्हापुरात २५ ऑक्टोबरनंतर अपेक्षित असलेल्या ‘ऑक्टोबर हीट’चा उतरतीकडे कल जाणवू लागला असून पहाटे आणि रात्री बोचरी थंडी जाणवू लागली आहे. गारव्यात कमालीची वाढ झाली आहे. राज्यात पहाटेचे किमान तापमान भागपरत्वे सरासरीपेक्षा कमी जाणवत असून, कोल्हापुरातील पारा २ ते ५ डिग्रीने खालावला आहे. कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस असून १६ अंश इतके किमान तापमान घसरलेले आहे.तापमानात प्रचंड घसरण झाल्याने सध्या थंडी बोचरी जाणवत आहे. त्यामुळे तालुक्यात लहानग्यांसह वृद्धांनादेखील घशाचा त्रास वाढला असल्याचे चित्र आहे. गेल्या चार दिवसांपासून पारा घसरल्यामुळे सर्वत्र थंडी आणि शहरात प्रवेश करतेवेळी सर्वत्र धुके पसरत असल्याचे चित्र दिसत आहे. पहाटे दव पडण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. वातावरण बदलल्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या घशाचा संसर्ग, तसेच आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. घसा खवखवणे, घशात वेदना होणे, डोके दुखणे आदी तक्रारी जाणवत आहेत. त्यामुळे सध्या खासगीसह पतंग शहा उपजिल्हा रुग्णालयात या तक्रारींचे दररोज शेकडो रुग्ण औषधोपचारांसाठी जाताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना हा त्रास अधिक आहे.
ईशान्य वाऱ्याचा वाढता जोर व उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी याअभावी महाराष्ट्रात थंडीला सुरवात झाली असे अजून तरी म्हणता येणार नाही, असे मत निवृत्त हवामानतज्ज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे. निरभ्र आकाश, कमी होत असलेली आर्द्रता आणि उच्चदाब क्षेत्राची खालावत असलेली घनता यामुळे महाराष्ट्रात नकळत उन्हाची काहिली कमी झाली आहे. वातावरण ऊबदार आहे. प्राथमिक अवस्थेतील रब्बी पिकांसाठी ही वातावरणीय परिस्थिती आल्हाददायक भासत आहे. नजीकच्या काळात महाराष्ट्रात सध्या कोणत्याही प्रकारातून पावसाची शक्यता नाही, असाही अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे.