इचलकरंजी : तरुण मुलाचे हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक निधन झाले. हा धक्का सहन न झाल्याने पाठोपाठ आईचाही मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना येथील पुजारी मळा परिसरात मंगळवारी रात्री घडली. प्रीतम दादासाहेब तेरदाळे (वय ३०) आणि शोभा दादासाहेब तेरदाळे (५४) अशी त्यांची नावे आहेत, तर या दोघांच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांचीही प्रकृती अत्यवस्थ झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तेरदाळे कुटुंबीय पुजारी मळा परिसरात राहण्यास आहेत. प्रीतम हा इंजिनिअर होता. तो लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामास होता. मंगळवारी (दि.२३) रात्री घरात जेवण करून प्रीतम बाहेर दारात गप्पा मारत बसला होता. त्यावेळी अचानकपणे त्याला हृदयविकाराचा त्रास होऊन तो खाली कोसळला. आई शोभा यांच्यासमोरच ही घटना घडल्याने त्यांनाही भोवळ आली.हा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रीतम याला तातडीने रुग्णालयात नेले. याचदरम्यान शोभा यांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांनाही रुग्णालयात हलविण्यात आले. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आई व मुलाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.दोघांचेही निधन झाल्याचे वृत्त समजताच नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, पत्नी व मुलगा या दोघांच्या मृत्यूची माहिती समजल्यानंतर दादासाहेब तेरदाळे हेही अत्यवस्थ झाले. त्यामुळे त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. शोभा आणि प्रीतम यांच्या शवविच्छेदनानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रीतम याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे पुजारी मळा परिसरावर शोककळा पसरली आहे. माय-लेकाचा मृतदेह पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. परिसरात या घटनेची चर्चा आणि हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
Kolhapur: मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू; धक्क्याने आईने सोडला जीव!; वडिलांचीही प्रकृती अत्यवस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:04 PM