सुहास जाधव
पेठवडगाव : उभ्या पावसात बस थांबवून बसमधील महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना खाली उतरवून एका कॉलेजच्या बसवर कारवाई करण्याचा प्रकार मोटार वाहन निरीक्षकाने केला. मोटार वाहन निरीक्षकाच्या या प्रतापबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मुलींना मात्र भर पावसात या घटनेमुळे दीड तास उभा राहायची वेळ आली. कॉलेजच्या अध्यक्षांनी या घटनेची मुख्यमंत्री पोर्टल वर तक्रार दिली आहे.काल, बुधवारी सायंकाळी पेठवडगाव परिसरातील एका कॉलेजची बस कॉलेज सुटल्यानंतर वाठार हुन इचलकरंजी कडे जात होती. यावेळी जोरदार पाऊस सुरू होता. या दरम्यान आरटीओ अधिकाऱ्याने ही बस थांबविली. भर पावसात बसमधील विद्यार्थीनींना उतरवून बसची कागदपत्रे तपासली. हा तपासणीचा घोळ बराच वेळ सुरू होता. तर इकडे मुली मात्र पावसात भिजतच उभा राहिल्या होत्या.त्याच मार्गावरून संस्थेचे अध्यक्ष निघाले असता त्यांनी हा प्रकार पाहिला. मुली भिजतायेत आणि बस तर रिकामी आहे. या घटनेने त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला याबाबत्तीत माहिती विचारली. त्यावेळी मी करीत असलेली कारवाई योग्य आहे असे त्यांनी सांगितले. यावर अध्यक्ष यांनी तुम्ही कागदपत्रे तपासा कारवाई करा. पण भर पावसात मुलींना खाली उतरून कशी कारवाई करता असा प्रश्न केला. त्यावेळी मी करतोय ते बरोबर आहे. तुम्हाला कोठे तक्रार करायची ती करा असे संबंधित अधिकाऱ्याने उत्तर दिल्याचे संस्थेच्या अध्यक्षांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.याबाबत अध्यक्षांनी म्हणाले, आमच्या बसचे काही कागदपत्रे अपूर्ण असतील तर जरुर कारवाई करावी. पण मुलींना पावसात उतरून भिजायला लावणे हा प्रकार अशोभनीय आहे. त्यामुळे या घटनेची तक्रार मुख्यमंत्री पोर्टलला केली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकाराबाबत संबंधित आरटीओ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही.