चंदगड : शेतीमालाला हमीभाव मिळवून देणारा कायदा करण्यासाठी एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.तुडीये येथील बळीराजा हुंकार यात्रेच्या जागर सभेसाठी ते चंदगडला आले होते. दरम्यान, ढोलगरवाडी येथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ऊसदर नियंत्रण समितीत दुबळी माणसे असल्यानेच सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे पाडले, असा आरोप त्यांनी केला.शेट्टी म्हणाले, बळीराजा हुंकार यात्रेच्या माध्यमातून हमीभावासाठी जागर सुरू आहे. ग्रामसभांच्या ठरावासह ३०० हून अधिक संघटना राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. कायदा झाल्यास शेतीमालाचे भाव वर्षभर स्थिर राहतील. यावेळी पीएचडी मिळविल्याबद्दल शाहू गावडे यांचा शेट्टी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार झाला. यावेळी राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, राजू पाटील, पंकज पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. दीपक पाटील यांनी आभार मानले.
धोरणानुसार निवडणुका लढवाव्यात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक मुद्द्यांवर होत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापल्या पातळीवर संघटनेच्या धोरणास अनुसरून निवडणुका लढवाव्यात, त्यास आपला पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.