कोल्हापूर : शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणारा महापालिकेच्या शेलाजी वन्नाजी विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापक संजय जयसिंग नार्वेकर याच्यावर महानगरपालिकेने शुक्रवारी निलंबनाची कारवाई केली. याबाबत प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी शुकवारी आदेश काढले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी गुरुवारी लक्ष्मीपुरी येथील शाळेत नार्वेकर याच्यावर कारवाई केली. वडील आणि पाच चुलत्यांचे शाळा सोडल्याचे दाखले मिळावेत, अशी मागणी तक्रारदाराने शेलाजी वन्नाजी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे केली होती. सहा दाखले देण्यासाठी प्रभारी नार्वेकर याने तीन हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. अधिकाऱ्यांनी शाळेत सापळा रचला. त्यात नार्वेकर तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला. त्याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यासंदर्भात सूचनापत्र सादर करून न्यायालयात हजर केले. त्यास एक दिवसाची कोठडी मिळाली आहे. या गंभीर गैरवर्तनाबद्दल सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार नार्वेकर यास अटक केलेल्या दिनांकापासून महानगरपालिकेच्या सेवेतून तत्काळ निलंबित केले आहे. याबाबतचा आदेश प्रशासकांनी शुक्रवारी काढला.
लाचप्रकरणी मुख्याध्यापक संजय नार्वेकर निलंबित, कोल्हापूर महापालिकेकडून तत्काळ कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 19:16 IST