गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) येथे कृषी महाविद्यालयाच्या परिसरात गणेश नामदेव संकपाळ ( वय ४०, रा. गणेश कॉलनी, उचगाव) याचा निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. धारदार शस्त्राने वार करून सिमेंटच्या पाइपचा तुकडा डोक्यात घालून हा खून करण्यात आला. पानपट्टीच्या पैशाच्या उधारीवरून संकपाळ याचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी विकी ऊर्फ वेंकटेश संजय जगदाळे (वय २४ ), रतनकुमार रमेश राठोड (वय २० ) , ओम गणेश माने (वय २१, तिघे रा. उचगाव, ता करवीर), रोहन गब्बर कांबळे (वय २०, रा टेंबलाई नाका, रेल्वे फाटक, कोल्हापूर ) करण राजेंद्र पुरी (वय २३, रा. रेस कोर्स नाका, संभाजीनगर, कोल्हापूर ) यांना ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद पत्नी दैवशाला गणेश संकपाळ यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली.अधिक माहिती अशी, गणेश संकपाळ याला दारू पिण्याचे व्यसन होते. काही दिवसांपूर्वी त्याने व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले होते. बुधवारी तो सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तब्येत बिघडली आहे डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेऊन येतो असे घरात सांगून निघून गेला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास विकी जगदाळे याच्या पानटपरीतून सिगारेटचे पाकीट उधार घेऊन गेला होता. बराच वेळ उधारी देण्यासाठी आला नाही. उधारीचे पैसे वसूल करण्यासाठी मित्रांसमवेत संशयित गेले असता त्यांच्यात वादावादी होऊन धारदार शस्त्राने आणि सिमेंटच्या पाइपने त्याला मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा खून झाल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे उपविभागीय अधिकारी अनिकेत गोसावी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाने गांधीनगरचे सपोनी सत्यराज घुले, मोहन गवळी, आकाश पाटील, आयुब शेख, चेतन बोगाळे, राजू नाईक, अशोक पोवार व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरविली. अवघ्या काही तासांत पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
छापा टाकून पकडले, एक पोलिस जखमीगांधीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला यातील संशयित आरोपी संभाजीनगर येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. तेथे पोलिस हवालदार मोहन गवळी, आकाश पाटील व आयुब शेख यांनी छापा मारला. पण संशयित आरोपी पळून जात असताना त्यांना पोलिसांनी पकडले. त्यात पोलिस हवालदार आकाश पाटील जखमी झाले.