विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या एकूण सतरा निवडणुकांमध्ये तब्बल बारा वेळा एकास एक लढत झाली आहे. पाचवेळा तिसरा उमेदवार जरूर रिंगणात राहिला आहे परंतु त्याला स्पर्धेतील अन्य दोन उमेदवारांपेक्षा फारच कमी मते मिळाली आहेत. याचा अर्थ असा की कोल्हापूरच्या जनतेच्या मनात निवडून द्यायवयाच्या उमेदवाराबाबत कायमच फारशी संदिग्धता नसते. अनेकदा उमेदवारी जाहीर झाल्यावरच त्याचा निकाल बऱ्यापैकी स्पष्ट झालेला असतो. यंदाही दोन्ही मतदार संघांत तब्बल महिन्यापूर्वीच तसेच काहीसे वातावरण दिसत आहे.सन १९५२ व ५७ च्या निवडणुका दोन सदस्यीय पद्धतीने झाल्या. त्यामुळे कोल्हापूरने आतापर्यंत निवडणूका सतरा आणि खासदार १९ निवडले आहेत. कोल्हापूरचे वैशिष्टय असे की पक्षीय बंधन झुगारून त्यांने चांगल्या उमेदवाराला गुलाल लावला आहे. त्यामुळे दोनवेळा अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. कोल्हापूर हा अत्यंत जागरूक जिल्हा आहे. त्याने आतापर्यंत स्वत:चा विकास स्वत:च्या हिंमतीवर केला आहे. राजकीय नेतृत्व आपल्यासाठी काहीतरी करेल, अशा भ्रमात तो राहत नाही. आपल्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी तो दबावगट तयार करतो व सरकारला त्यानुसार भूमिका घ्यायला भाग पाडतो. त्याची जगण्याची रीतही रोखठोक असते हे किंवा ते अशी ती आक्रमक असते. तो प्रेम करतानाही हातचे राखून काय करत नाही आणि विरोध करतानाही टोकाला जातो. कोण निवडून येणार यापेक्षा कोण निवडून येणार नाही याचे गणित त्यांने अगोदरच मनांत पक्के केलेले असते. कोल्हापूर हा विरोधी विचारांचा जिल्हा आहे असे म्हटले गेले. कारण राज्यात, केंद्रात जे सत्तेत आहेत, त्यांच्या नेमका जनमताचा उलटा कौल त्यांने अनेकदा दिला आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, शेकापक्षाचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा एकेकाळी काँग्रेसच्या प्रभावाखालीही होता. डाव्या पुरोगामी विचारांच्या या जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत प्रथमच उजव्या विचारांना जनतेने यश दिले.
कोणत्या पक्षाचे कितीवेळा झाले खासदारकाँग्रेस : १०राष्ट्रवादी काँग्रेस : ०३अपक्ष : ०२शेतकरी कामगार पक्ष : ०२शेड्युल्ड कास्ट फेडरेशन : ०१शिवसेना : ०१(पहिल्या दोन निवडणुकीमध्ये द्विसदस्यीय पद्धती असल्याने सतरा निवडणुका आणि १९ खासदार झाले आहेत)
कुणाला कितीवेळा मिळाली खासदारकीउदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस) : ०५सदाशिवराव मंडलिक (काँग्रेस व राष्ट्रवादी) : ०४
कोल्हापूरच्या माणसांत राजकीय प्रगल्भता आहे. राजकीय भूमिकेचा विचार तो सामाजिक भूमिकेला जोडून करतो. कोल्हापूरने एकदा भूमिका घेतली की त्याचे प्रतिबिंब राज्यात उमटते. तसे अन्य जिल्ह्यांच्या बाबतीत घडत नाही. - प्रा.विलास रणसुभे, राज्यशास्त्राचे अभ्यासक