कोल्हापूर : महाविकास आघाडीचे बहुतांश मतदारसंघांतील उमेदवार निश्चित झाले असले, तरी ‘कोल्हापूर उत्तर’चा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. यासाठी आज सकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी इच्छुकांची बैठक बोलावली आहे. आजच्या बैठकीनंतर कोल्हापूरकरांना उमेदवारीचे ‘उत्तर’ मिळणार का, याकडे उत्सुकता लागली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तरीही महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होत नाहीत. काँग्रेसकडे ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये सर्वाधिक इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार, याविषयी कमालीची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ आपणाला मिळावा, यासाठी उद्धवसेनेने दावा केला आहे. त्यांच्याकडून पक्षाचे उपनेते संजय पवार, शहरप्रमुख रविकिरण इंगवले इच्छुक आहेत.काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून विद्यमान आमदार जयश्री जाधव, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह डझनभर इच्छुक आहेत. यापैकी कोणाला संधी मिळते की सतेज पाटील नवीन चेहरा समोर आणतात, हे पाहावे लागणार आहे.याबाबत, आज काँग्रेस कमिटीत इच्छुकांची बैठक बोलावली आहे. यामध्ये इच्छुकांची मते अजमावून घेतली जाणार आहेत. काँग्रेसचे सर्वच उमेदवार उद्या, गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आज, ‘कोल्हापूर उत्तर’च्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.
‘ते’ उद्योगपती कोण?आमदार सतेज पाटील यांनी ‘कोल्हापूर उत्तर’च्या उमेदवारीबाबत कमालीचा सस्पेन्स ठेवला आहे. मराठा उद्योजक रिंगणात उतरणार असल्याची काँग्रेस अंतर्गत चर्चा सुरू असली, तरी ‘ते’ उद्योगपती कोण, याबाबत उत्सुकता आहे.