उद्धव गोडसेकोल्हापूर : व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाऱ्या गुंडांची संख्या शहरात वाढली आहे. हप्ते वसूल करून खाद्यपदार्थांवर फुकट ताव मारणाऱ्या फाळकूट दादांमुळे व्यावसायिकांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. हप्ते किंवा पदार्थ देण्यास विरोध केला तर गुंडांकडून मारहाण करून दहशत माजवली जाते. याच प्रकारातून उद्यमनगरात एका स्वीटमार्ट चालकाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे शहरातील गुंडांकडून होणाऱ्या हप्ता वसुलीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवाजी पेठेतील राजाराम चौकातही भरदिवसा किराणा दुकानात तोडफोडीची घटना घडली आहे.झोपडपट्ट्यांसह उपनगरांमध्ये बेरोजगारांच्या झुंडी वाढत आहेत. विशीतील तरुण मावा, गुटखा आणि गांजाच्या आहारी गेले आहेत. परिसरातील एखादा भाई, दादा, भाऊ यांच्या नादी लागून अवैध धंद्यांमध्ये ओढले जात आहेत. असे बेरोजगार आणि नशेबाज तरुण स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी दहशतीचा वापर करत आहेत. एक-दोन प्रसंगात परिसरातील भाई किंवा राजकीय वरदहस्त लाभताच यांचा आत्मविश्वास वाढतो. काही कुख्यात गुंडांचे नाव घेऊन यांची वसुली, हप्ताखोरी सुरू होते. आमच्या भागात धंदा करून पैसे कमवताय, मग ४००-५०० रुपये दिले म्हणून काय बिघडले, असे म्हणत यांच्या दमदाटीला सुरुवात होते.कोणी विरोध केला तर त्याला व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली जाते. नातेवाईकांना त्रास दिला जातो. मारहाण आणि तोडफोड केली जाते. पोलिसांत तक्रार दिली तर जिवे मारण्याची धमकी दिली जाते. विशेषत: परप्रांतीय व्यावसायिकांना लक्ष्य करून त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. बेकरी, स्वीटमार्ट मालक, पाणीपुरी, दाबेली, भेळचे गाडीवाले, आईस्क्रीम विक्रेते, किराणा दुकानदारांना त्रास दिला जातो.शहरात मध्यवर्ती बसस्थानक परिसर, राजारामपुरी, उद्यमनगर, फुलेवाडी, हॉकी स्टेडियम, रंकाळा परिसरात फाळकूटदादांच्या टोळ्याच सक्रिय आहेत. रोज दोन-तीन व्यावसायिकांकडून पैसे उकळायचे आणि ते नशेत उडवायचे. पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना मारहाण करायची. पोलिसांशी संगनमत करून दहशत वाढवायची, असे प्रकार सुरू आहेत. यादवनगरातील फाळकूट दादांच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी अनेकदा राजारामपुरी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.मात्र, पोलिसांनी वेळीच गांभीर्याने फाळकूट दादांवर कारवाई केली नाही. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या गुंडांनी थेट स्वीट मार्टमध्ये घुसून व्यावसायिकास मारहाण केली. त्यानंतर टिंबर मार्केट परिसरातही अशीच घटना घडली. शहरात सलग दोन दिवस घडलेल्या घटनांमुळे गुंडांची दहशत स्पष्ट झाली आहे. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिस अधीक्षकांना फाळकूट दादा आणि गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी ऑलआऊट मोहीम राबवावी लागणार आहे.
जुजबी कारवाईमुळे गुंड मोकाटसात वर्षांच्या आतील शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करू नये. त्यांच्यावर न्यायालयात खटले दाखल करावेत, असे न्यायालयाचे आदेश आहेत. पूर्वीप्रमाणे गुंडांना पोलिसी खाक्या दाखविण्यावर आता मर्यादा येतात. त्यामुळे गुंडांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही.
पोलिसांकडूनही त्रासत्रास देणाऱ्या गुंडांच्या विरोधात तक्रारी दिल्यानंतर पोलिस त्यांच्यावर वेळेत आणि ठोस कारवाया करीत नाहीत. काही गुंडांना अभय देऊन पोलिसांकडून पाठबळ दिले जाते. या प्रकारामुळे आत्मविश्वास दुणावलेले गुंड राजरोसपणे हप्ता वसुली करतात. भरदिवसा मारहाण करून दहशत माजवतात. पोलिसांनी वेळेत नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेऊन गुंडांवर कारवाया करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.
२०२३ मधील कारवायागुन्हा - प्रस्ताव - मंजूरप्रतिबंधात्मक कारवाया - ३२८२ - ३१०१एमपीडीए - ०५ - ०२
मोक्काचे प्रस्ताव प्रलंबितगेल्या वर्षभरात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मोक्कांतर्गत कारवाईसाठी ४५ प्रस्ताव पाठविले मात्र, यातील एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. यातील २३ गुन्हेगार अटकेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.