कोल्हापूर : एटीएम कार्डची अदला-बदल करून अज्ञात दोघांनी एका वृद्धास फसवून त्याच्या बँक खात्यावरील परस्पर ४५ हजारांची रोकड काढल्याची घटना रंकाळा स्टँड परिसरात सोमवारी सकाळी घडली. दीपक कोळपकर (वय ६३, रा.पारोळा, जि. जळगाव) यांनी याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दीपक कोळपकर काही कामानिमित्त कोल्हापूरला आले होते. सोमवारी सकाळी ते रंकाळा स्टँड परिसरातील एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी सेंटरमध्ये असलेल्या दोघांनी कोळपकर यांना बोलण्यात गुंतवले व तुमच्या खात्यावरील पैसे काढून देतो असे सांगून त्यांचे एटीएम कार्ड घेतले. त्याचवेळी त्या दोघांनी त्यांच्या एटीएम कार्डची अदला-बदल केली. त्यानंतर दोघे निघून गेले.काहीवेळाने त्याच एटीएम कार्डचा वापर करून त्या दोघा ठकसेनांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या सेंटरवरून ३० हजारांची रोकड घेतली. तसेच त्याच कार्डचा वापर करून औषध दुकानातून पाच हजारांची औषधे खरेदी केली. तर १० हजारांच्या साड्या अशी परस्पर खरेदी करून कोळपकर यांची फसवणूक केली. याबाबत कोळपकर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात दोघांवर गुन्हा नोंद केला आहे.