कोल्हापूर : शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील वैभव मारुती यादव (वय २७) याने सोमवारी (दि. ११) सायंकाळी राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. गळफास घेताना जुनी दोरी तुटल्यानंतर वैभव याने नवीन नायलॉनची दोरी आणून त्यासोबत मोबाइलमध्ये सेल्फी घेतली. त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव यादव हा शिरोली दुमाला येथे आई, वडील आणि भाऊ यांच्यासोबत राहत होता. त्याचे वडील शेती करतात, तर आई गृहिणी आहे. गेल्या दीड महिन्यांपासून वैभव गावातच पानपट्टी चालवून शेतात वडिलांना मदत करीत होता. सोमवारी दुपारी वडील आणि लहान भाऊ शेतात गेले होते, तर आई देवदर्शनासाठी बाहेर गेली होती. घरात कोणी नसताना त्याने दोरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. गळफास घेताना जुनी दोरी तुटल्याने त्याने बाहेरून नवीन दोरी आणली. नवीन दोरीचा फास तयार करून त्यासोबत मोबाइलमध्ये सेल्फी घेतली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
नातेवाईक घरी आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने वैभव याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अचानक घडलेल्या प्रकाराने नातेवाईक आणि मित्रांना धक्का बसला. सीपीआरमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली होती. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. सीपीआर पोलिस चौकीत घटनेची नोंद झाली.