कोल्हापूर : एकीकडे भाजप ४०० हून अधिक जागा जिंकण्याच्या घोषणा करीत असला तरी विविध वाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील निम्म्या जागा महाविकास आघाडी जिंकेल, असे स्पष्ट चित्र समोर आले आहे. याचमुळे अपेक्षित यश मिळणार नसल्याच्या अस्वस्थेतूनच राज्यासह देशभरात भाजप फोडोफाेडीवर भर देत असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
ईडी, सीबीआय आणि अन्य तपास यंत्रणांचा यासाठी वापर सुरू असून ‘मोदी है तो मुमकीन है’ असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला. कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले पवार रवाना होण्यापूर्वी बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, गेल्या काही दिवसांत इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही. कारण त्या-त्या राज्यातील प्रमुख पक्ष आणि त्यांचे घटक पक्ष यांच्यात चर्चा सुरू आहेत. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला व्यक्तिश: फार आश्चर्य वाटले नाही. कारण श्वेतपत्रिकेत आदर्श प्रकरणाचा उल्लेख आल्यानंतर त्यांना ती धमकावणी वाटली आणि त्यांनी निर्णय घेतला.भाजप सत्तेसाठी कशा पद्धतीने कोणत्या थराला जाऊन सत्तेचाच गैरवापर करतेय, याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंदीगड महापालिकेचे आहे; परंतु कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना संपवायचे असे केंद्र सरकारचे धोरण दिसत आहे. पवार म्हणाले, पक्ष काढला मी आणि तो चिन्हासह दुसऱ्याच्या हातात देऊन टाकला. सात दिवसांत आम्हाला चिन्ह द्यावं, असं न्यायालयानं निवडणूक आयोगाला ताशेरे ओढून सांगितलं आहे.
मराठा आरक्षणाबाबत शंकामराठा आरक्षणाच्या टिकण्याबाबत माझ्या मनात शंका आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण दिले होते ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. घटनातज्ज्ञ उल्हास बापटही हे आरक्षण टिकणार नाही म्हणत आहेत. त्यामुळे माझ्याही मनात शंका आहे.
सोडून गेलेले ९५ टक्के पराभूतमहाराष्ट्रात १९८० साली महाराष्ट्रात माझे ५९ आमदार निवडून आले होते. निवडणुकीनंतर मी १० दिवस परदेशात सुटीवर गेलो. परत आलो तर त्यातील ५३ जणांनी मला सोडले होते. त्यानंतर जे काय करायचं ते मी केलं. पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक झाली. त्यावेळी सोडून गेलेल्यांपैकी ९५ टक्के पराभूत झाले. इतिहासाची पुनरावृत्ती नेहमीच होत असते. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोण उभे राहणार आहे, हे अजून ‘त्यांनी’ जाहीर केलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तुरुंगापेक्षा भाजप बरा..काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला अजिबातच आश्चर्य वाटले नाही. कारण भाजपने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श प्रकरणात त्यांचे नाव आले होते. त्यामुळे त्यांना धमकावण्यासाठीच तो उल्लेख केला होता. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा..तुरुंगापेक्षा भाजप बरा, असे आता लोकच म्हणून लागल्याची टीका पवार यांनी केली.
सुप्रिया लोकसभा लढवतेमुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी पवार यांची धडपड असल्याची टीका भाजप नेते अमित शाह करतात, पण सुप्रिया लोकसभेत काम करते हे त्यांना कदाचित माहीत नसावे, असा टोला त्यांनी लगावला. बारामती मतदारसंघातून चर्चा काहीही असली तरी अजून विरोधकांनी कुणाच्याही नावांची अधिकृत घोषणा केलेली नाही. ती करतील तेव्हा पाहू, असे सांगून त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबतच्या प्रश्नाला अनुलेखाने मारले.