कोल्हापूर : शिवसेना स्थापन झाल्यापासूनचा मी केडरमधील कार्यकर्ता आहे, बाकीचे आता आलेले आहेत. त्यामुळेच मलाच मंत्रिपद मिळेल असा विश्वास शिंदेसेनेचे नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे या पक्षात मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र स्पष्ट झाले. पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळायला हवे असा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली.क्षीरसागर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काॅमन मॅन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा चालला, त्यामुळे महायुतीचा विजय झाला आहे.
एकनाथ शिंदे यांनी मोदी शहा यांनी घेतलेला निर्णय मान्य असेल सांगितल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग सुखकर झाला आहे. शिंदेसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मंत्रिपद मिळतील अशी खात्री आहे. १० पैकी १० जागा महायुतीच्या येणार हे मी आधी पासून म्हणत होतो. लोकसभेनंतर हिंदू देखील एकवटले आणि त्यांनी दाखवून दिले एकत्र आल्यावर हिंदू काय करू शकतो. जिल्ह्यात शिंदेसेनेचा १ खासदार ३ आमदार आणि २ पाठिंबा असलेले आमदार आहेत.ज्याचे जास्त आमदार त्याला पालकमंत्री पद फॉर्मुला आहे. मी ही तिसऱ्या टर्मचा आमदार आहे.. गेली पाच वर्ष नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष या मंत्री पदाच्या दर्जाचा कार्यभार व्यवस्थित सांभाळला आहे. मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून शाश्वत परिषदेसारख्या संकल्पनांद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात विकासाची वाटचाल सुरू केली आहे. यामुळे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी आम्ही आग्रही आहोत असा दावा आमदार क्षीरसागर यांनी केला आहे.
वास्तव काय..? शिंदेसेनेचे क्षीरसागर, प्रकाश आबिटकर आणि चंद्रदिप नरके हे आमदार झाले आहेत. त्यातील क्षीरसागर व नरके हे एकदा पराभूत होवून आता तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. आबिटकर यांनी हॅट्रटिक केली आहे. गेल्या निवडणूकीनंतरही त्यांचे नांव राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आले होते. पण ऐनवेळेला राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मध्येच मुसंडी मारल्याने आबिटकर राज्यमंत्रिपदापासून वंचित राहिले. यड्रावकर हे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधून आहेत. त्यामुळे त्यांचेही नांव राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. पद एक आणि स्पर्धक चार अशी सध्या स्थिती आहे. त्यात कोण बाजी मारतो याची उत्सुकता आहे. कोल्हापूर शहराचे राजकारण, महापालिका निवडणूक आणि माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध यामुळे क्षीरसागर या स्पर्धेत पुढे असल्याचे दिसत आहे.