कोल्हापूर : शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविणारा कोल्हापुरातील पथदर्शी प्रकल्प राज्यातील अन्य जिल्ह्यातही राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केले. प्रकल्पामुळे शासनाच्या विविध सेवा नागरिकांच्या घरोघरी वेळेत जातील. नागरिक व प्रशासनामध्ये चांगले नाते निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे झाले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, आमदार प्रकाश आबिटकर, राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाची माहिती देणाऱ्या चित्रफितीचे अनावरण तसेच क्यूआरकोड, मदतीसाठीचा टोल फ्री क्रमांक, सेवांच्या माहितीसाठी व्हॉट्सॲप चॅटबोट यांचे अनावरण झाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या मंगलदिनी आपण लोकाभिमुख, राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मभूमीतून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात करत आहोत. सेवांचा प्रभावी वापर होऊन कायदा लोकापर्यंत पोहचला पाहिजे. यावेळी त्यांनी पथदर्शी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात सुरू केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे, प्रकल्पाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणारे आमदार प्रकाश आबिटकर तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ व राज्य उत्पादक शुल्क मंत्री, शंभूराजे देसाई यांचेही त्यांनी अभिनंदन केले.घरपोच सेवा, सेवा वाहिनी, आपले सरकार वेब पोर्टल आरटीएस मोबाइल ॲप्लिकेशन, व्हॉट्सॲप चॅटबॉट, प्रत्येक तालुक्यात एक आदर्श आपले सरकार सेवा केंद्र तसेच लोकांच्या तक्रारीसाठी सुरू केलेली क्युआर कोड संकल्पना, कार्यालयांचे मानांकन करून प्रशासन गतिमान करण्याचे नियोजन या सुविधा कौतुकास्पद आहेत.मंत्री मुश्रीफ यांनी कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कोल्हापूरची निवड केल्याबद्दल शासनाचे आभार मानले. मंत्री शंभुराज देसाई यांनी लोकांना सेवा घेत असताना होणारा त्रास कमी करण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी हा पायलट प्रकल्प कोल्हापुरातून सुरू केल्याचे सांगितले.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, सर्व सामान्यांना योग्य पद्धतीने सेवा अंमलबजावणीत या कायद्याचा उपयोग करून अधिकाधिक पारदर्शक, लोकाभिमुख कारभार ही प्रशासनाची जबाबदारी महत्त्वाची आहे. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सेवा हमी कायदा व पथदर्शी प्रकल्पाची माहिती दिली. करवीरचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी आभार मानले.