कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. होमटाऊनबाहेर जाणारे सुमारे ६७ पोलिस अधिकारी असून, महिनाभरात त्यांच्या बदल्यांचे आदेश निघतील, अशी माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुरुवारी (दि. ४) दिली.निवडणुकांच्या काळात स्थानिक पोलिस अधिकारी त्यांच्या मूळ जिल्ह्यात कार्यरत राहिल्यास तो निवडणुकीच्या कामांवर प्रभाव टाकू शकतो. राजकीय नेते, उमेदवार त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या केल्या जातात. आगामी लोकसभा निवडणुुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या केल्या जाणार आहेत.यात सात पोलिस निरीक्षक, २० सहायक पोलिस निरीक्षक आणि ४० उपनिरीक्षकांचा समावेश आहे. बदलीस पात्र असलेल्या अधिकाऱ्यांचा अहवाल पोलिस अधीक्षकांकडून नऊ जानेवारीपर्यंत विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयास पाठवला जाणार आहे. महानिरीक्षक कार्यालयाकडून परिक्षेत्रातील बदलीपात्र अधिकाऱ्यांचा अहवाल १२ जानेवारीपर्यंत गृह विभागाला कळवला जाईल. त्यानंतर बदल्यांचे आदेश निघतील, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली.नवीन अधिकाऱ्यांवर जबाबदारीऐन निवडणुकीच्या काळात अनेक नवीन पोलिस अधिकारी जिल्ह्यात येणार आहेत. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. यासाठी कमी वेळेत त्यांना जिल्हा समजून घ्यावा लागेल. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, गावगुंड, फाळकूट दादांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे काम त्यांना करावे लागेल.
निवडणूकपूर्व तयारी; होमटाऊनबाहेर जाणार ६७ अधिकारी; कोल्हापूर जिल्ह्यातील बदल्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 1:39 PM