कोल्हापूर : खून, खंडणी आणि सावकारीच्या प्रकरणातील गुंड अमोल भास्कर याने शहरात झळकवलेले शुभेच्छा फलक पोलिसांनी आज, बुधवारी (दि. २३) दुपारी हटवले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त गुंड भास्कर याने शहरातील प्रमुख चौकांमध्ये भव्य शुभेच्छा फलक लावल्याने शहरात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या फलकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचाही फोटो छापण्यात आला होता.खून, मारामारी, अपहरण, खासगी सावकारी अशा गंभीर गुन्ह्यांमुळे मोक्काची कारवाई झालेला गुंड अमोल भास्कर याने आज शहरात अनेक ठिकाणी शुभेच्छा फलक झळकवले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात ताराराणी चौक, जनता बाजार चौक, बागल चौक, संभाजीनगर चौकात हे फलक लावले होते. अट्टल गुंडाचे शुभेच्छा फलक झळकताच शहरात खळबळ उडाली. याबद्दल नागरिक आणि प्रसार माध्यमांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटताच पोलिसांनी शुभेच्छा फलक हटवले.गुंड भास्कर याने फलकावर स्वत:चा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते म्हणून केला होता. दरम्यान, महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने शहरात अनेक ठिकाणी कमानी लावण्यात आल्या आहेत, तसेच शुभेच्छा फलक झळकले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह झळकलेलं कोल्हापुरातील अट्टल गुंडाचे पोस्टर पोलिसांनी हटवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 5:25 PM