समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील मातब्बर नेते हसन मुश्रीफ यांनीच शिवसेना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्याचे राजकारणच बदलणार आहे. यापुढच्या काळात मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. धनंजय महाडिक, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे यांची यापुढच्या राजकारणामध्ये गट्टी दिसणार आहे. आ. पी. एन. पाटील, आ. सतेज पाटील, माजी खा. राजू शेट्टी आणि ठाकरे गटाला इतर छोट्या-मोठ्या गटांना एकत्रित करून त्यांच्याविरोधात मोट बांधावी लागणार आहे.जिल्ह्याच्या राजकारणात गेली काही वर्षे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या दोघांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुकांमध्ये यश मिळाले. अगदी ‘गोकुळ’ मध्येही त्यांनी सत्तांतर घडवून आणले. कोल्हापूर महापालिकेतील सत्ता मिळवण्यापासून ते जिल्हा परिषदेत चार वर्षांपूर्वी सत्तांतर करण्यापर्यंत सर्वत्र हे दोघेच प्रामुख्याने जोडण्या घालत होते. परंतु त्यातील मुश्रीफ आता युतीसोबत गेल्याने साहजिकच सतेज पाटील एकाकी पडल्याचे चित्र आहे.सध्या सतेज पाटील यांच्यासोबत पी. एन. पाटील,जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयंत आसगावकर ही सर्व मंडळींच्या बरोबरच ठाकरे गटही तडफेने सोबत आहे. पुढच्या काळात पाटील बेरजेचे राजकारण करत माजी खा. राजू शेट्टी यांनाही सोबत घेऊ शकतात. त्यामुळे सतेज यांनाच पुढाकार घेऊन पुन्हा एकदा जिल्ह्यात समर्थ विरोधकाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. शेट्टी यांचा मुख्यत : राष्ट्रवादी काँग्रेस व त्यातही मुश्रीफ यांच्याशीच संघर्ष होता.अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये यापुढच्या काळात शिवसेना, भाजपसोबत सर्व निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपासून अन्य निवडणुकांमध्येही आता हे सर्वजण एकत्र दिसणार आहेत. कागल, आजरा, गडहिंग्लज या तीन तालुक्यांत मुश्रीफ यांचे प्राबल्य आहे. चंदगडचे आ. राजेश पाटील हेदेखील मुश्रीफ यांच्यासमवेत गेले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महाडिक गटाची ताकद आहे. पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ तालुक्यात अनुक्रमे कोरे, आवाडे यांची ताकद आहे. त्यामुळे ही राज्यातील सत्तारूढ आघाडी आणखी मजबूत झाल्याचे मानले जाते.
सर्व जबाबदारी सतेज यांच्यावरया सगळ्यांना टक्कर देण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र करण्याची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्यावर आहे. त्यांचाही प्रत्येक तालुक्यात गटही आहे. त्यामुळे कॉंग्रेस, शरद पवार यांच्यासोबत राहणारे नेते, ठाकरे गट आणि स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेकाप अशा सर्वांना एकत्र करून लढाईचे नेतृत्व सतेज पाटील यांना करावे लागणार आहे.