गडहिंग्लज : जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या भणंग माणसामुळे दिल्लीच्या सत्तेचा सोपान उलटल्याचा इतिहास आहे.त्यामुळे सत्तेच्या बळावर जनतेच्या मनावर राज्य करता येते,असे कुणी समजू नये. महाराष्ट्रातील मोठ्या ग्रामविकास खात्याचे मोठे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मन मोठं करायला हवं होत. दोन्ही बाजू ऐकून निर्णय दयायला हवा होता.परंतु,त्यांनी एकाच बाजूचे ऐकले.'त्या' लोकांच्या मतावरच ते निवडून येणार असतील तर त्यांना माझा कोपऱ्यापासून दंडवत आहे,असा इशारा गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जनता दलाचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी शनिवारी दिला.
गडहिंग्लज कारखान्याच्या १२ संचालकांनी राजीनामे देण्यापूर्वी कोल्हापूरच्या विश्रामगृहात मुश्रीफ यांची भेट होती.त्याचा संदर्भ देत शिंदेनी थेट मुश्रीफांवरही तोफ डागली.शेतकरी, कामगारांतर्फे आयोजित रास्तारोकोप्रसंगी ते बोलत होते. शिंदे म्हणाले,'त्या' संचालकांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर आपणही आठवडयापूर्वी मुश्रीफांना भेटलो होतो.'त्यांना' समजावून सांगा आणि विषय संपवा अशी विनंती केली होती.दोन्ही बाजूच्या संचालकांची एकत्र बैठक घेऊन निर्णय घेऊया, असे मुश्रीफांनी सांगितले होते. त्यांच्या सूचनेनुसारच 'त्या' संचालकांशी आपणही चर्चा केली होती.परंतु,त्यांनी केवळ त्यांचेच ऐकले.त्यांनी आम्हांलाही बोलवून घेऊन आमच्याशी चर्चा करून निर्णय द्यायला हवा होता.परंतु,त्यांनी केवळ त्यांचेच ऐकले,असा आरोपही शिंदे यांनी केला. पदरमोड करून आम्ही कारखाना सुरू केला.
त्यावेळी आमच्याबरोबर असणाऱ्या प्रकाश चव्हाणांनीही आमची बाजू सोडली,त्याचा जाब लोकच त्यांना विचारतील. सुतगिरणी, सोयाप्रकल्प, शिवाजी बँक, प्रकाश नागरी पतसंस्था या संस्थाचं काय झालं ? असा सवालही त्यांनी केला.डेक्कन अॅग्रोमध्ये शेतकरी व कामगारांची फसवणूक करणारे डॉ. शहापूरकरही लबाड आहेत.त्यांच्याविरूध्द बदनामीचा दावा दाखल करणार आहोत,असा इशाराही त्यांनी दिला.