कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवात बुधवारी सायंकाळी मावळतीच्या किरणांनी अंबाबाईच्या मूर्तीला सूर्यस्नान घातले. सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी सोनसळी किरणे देवीच्या चेहऱ्यावर आली आणि किरणोत्सवाच्या मुख्य दिवशीच किरणोत्सव सोहळा पूर्ण क्षमतेने झाला. यावेळी भाविकांनी अंबा माता की जयचा गजर केला. आज गुरुवार व शुक्रवारीदेखील किरणाेत्सव होणार आहे.करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी चरणस्पर्श केला. बुधवारी मात्र वातावरण स्वच्छ होते. हवेत धूलिकणदेखील कमी होते. वाऱ्याचा वेग योग्य होता. सूर्यकिरणांमध्ये प्रखरता होती. त्यामुळे किरणे थेट अंबाबाईच्या चेहऱ्यापर्यंत गेली. गेल्या वर्षभरात अंबाबाईचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला नव्हता, यंदाही गेली दोन दिवस सूर्यकिरणे मंदिरात येईपर्यंत धूसर होत लुप्त होत होती. मंदिराचा खरा किरणोत्सव ३१ जानेवारी व १ व २ फेब्रुवारीला होतो. या तीन दिवसांतील मुख्य दिवशीच पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाल्याने भाविकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर येऊन लुप्त झाली. त्यानंतर देवीची आरती करण्यात आली. यावेळी भाविकांनी अंबा माता की जयचा गजर केला. आज गुरुवारी व शुक्रवारीदेखील किरणोत्सव असून याच क्षमतेने सूर्यकिरणे प्रखर राहिल्यास किरणे पुन्हा मूर्तीच्या चेहऱ्यावर किंवा खांद्यापर्यंत येतील, अशी शक्यता प्रा. मिलिंद कारंजकर यांनी व्यक्त केली.
किरणांचा प्रवास असा..
- महाद्वार रोड : ५ वाजून २८ मिनिटे
- गरुड मंडप : ५ वाजून ३३ मिनिटे
- गणपती मंदिर : ५ वाजून ३९ मिनिटे
- कासव चौक : ५ वाजून ५८ मिनिटे
- पितळी उंबरा : ६ वाजून ३ मिनिटे
- चांदीचा उंबरा : ६ वाजून ७ मिनिटे
- संगमरवरी पहिली पायरी : ६ वाजून ९ मिनिटे
- कटांजन : ६ वाजून १३ मिनिटे
- चरण स्पर्श : ६ वाजून १४ मिनिटे
- गुडघ्यापर्यंत : ६ वाजून १५ मिनिटे
- कमरेपर्यंत : ६ वाजून १६ मिनिटे
- खांद्यापर्यंत : ६ वाजून १६ मिनिटे
- चेहऱ्यावर : ६ वाजून १८ मिनिटे (नंतर लुप्त झाली.)