पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील रेडेडोहजवळ अज्ञाताने रस्त्यावर चर मारून बुधवारी ( दि. २४) मध्यरात्री यंत्राच्या सहाय्याने रेडेडोह फोडण्याचा प्रयत्न केला. ही घडना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. प्राधिकरण विभागाने खुदाई केलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून चर बुजविली. पुराचे पाणी प्रवाहित करण्याची रस्त्यावर चर मारली असले का ? अशी उलटसुलट चर्चा परिसरात सुरू आहे. या घटनेमुळे रस्त्यावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडीजवळ रेडेडोह आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी इशारा पातळीकडे जात असल्याने, बुधवारी मध्यरात्री अज्ञातांनी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर खुदाई करून चर मारण्याचा प्रकार केला आहे. केर्ली, रजपूतवाडी येथे पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.रस्ता खुदाई केलेला प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर प्राधिकरण विभागाने तत्काळ घटनेची पहाणी करून खुदाई केलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून चर बुजविण्यात आली. यावेळी करवीर अधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. महामार्गावर खुदाई करण्यासारखा अनुचित प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.रेडेडोह फुटला रेपूर्वी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाहू लागली की रेडेडोह फोडून पुराच्या पाण्याचा मार्ग मोकळा केला जायचा. रस्त्याची उंची आणि मजबुतीकरण केल्यानंतर रस्ता फोडण्याचा प्रकार बंद झाला होता. त्याला पर्याय म्हणून दोन पाईप टाकून पाणी काढून देण्यात आले होते; परंतु पूर्वी रेडेडोह फोडण्याचा बंद झालेला प्रकार बुधवारी रात्री पुन्हा घडल्याने गुरुवारी दिवसभर रेडेडोह फुटला रे….अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
मागणीकडे दुर्लक्षवीस वर्षांपूर्वी परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांच्याकडे रेडेडोहातील पुराचे पाणी प्रवाहित करण्याची विनंती केली होती. त्यावेळी पाटील यांच्या पुढाकारातून रस्त्यातून दोन पाईप घालून पुराचे पाणी सोडले होते. डोहात साठणाऱ्या पाण्याच्या दृष्टीने पाईपचा आकार लहान असल्याने हवे तितके पाणी निघून जात नाही. पुराचा धोका कमी होण्यासाठी त्याठिकाणी प्रवाह मोठा करून देण्याच्या शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे.