कोल्हापूर : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलेल्या क्वीन्स कॉमनवेल्थ कॅनोपे नावाने जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण केलेल्या तिलारीच्या घाटात पोल्ट्रीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून मृत कोंबड्यांचे अवशेष टाकण्याचा प्रकार बुधवारी वर्ल्ड फॉर नेचर या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. या वाहनचालकांना कार्यकर्त्यांनी समज दिली आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाला नुकसान होण्याबराेबरच आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.
चंदगड येथील पर्यावरणप्रेमी आणि वर्ल्ड फॉर नेचरचे अभिजित वाघमोडे आणि सहकाऱ्यांनी बुधवारी सकाळी तिलारी येथील सर्ज पॉइंट याठिकाणी पोल्ट्री वेस्ट टाकणाऱ्या पोरांना रंगेहाथ पकडले. यामध्ये मेलेल्या कोंबड्या, स्कीन, वेस्ट हे सर्व अत्यंत दुर्गंधीयुक्त व अपायकारक टाकाऊ पदार्थ होते. त्यांना समज देऊन सर्व कोंबड्यांचे वेस्ट पोत्यात भरून गाडीतून परत नेण्यास भाग पाडले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉर आणि मायस्टिरिका स्वॅम्प (जायफळाची राई) यांसारखी जागतिक जैविक वारसास्थळे याच्याशेजारीच हा प्रकार घडला आहे.
शिनोळी तसेच परिसरातून शेकडोंच्या संख्येने तिलारीत येणाऱ्या या पोल्ट्रीच्या गाड्या राेज रात्री घाट उतरून गोवा आणि बेळगावकडे जातात. वाटेतल्या हॉटेलमध्ये पोल्ट्रीतील कोंबड्या पुरविल्या की मृत कोंबड्या तसेच इतर कचरा या घाटातच टाकतात. याच्या जवळच चार किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉर आणि मायस्टिरिका स्वॅम्प ही वारसास्थळे आहेत. या प्रकारामुळे घाटात प्रचंड दुर्गंधी सुटलेली असते.
महापुरानंतर २०१९, २०२० आणि २०२१ पासून तिलारीच्या या जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या घाटात मृत कोंबड्या आणि पोल्ट्रीचा कचरा टाकण्याचा प्रकार होत आहे. याचा व्हिडिओ वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांना पाठविला आहे. त्यांनी संबंधिताना सूचना दिल्या आहेत.- अभिजित वाघमोडे, वर्ल्ड फॉर नेचर,