महेश आठल्ये, म्हासुर्ली
कोल्हापूर - म्हासुर्ली धामणी खोऱ्याची जीवनदायी असणाऱ्या धामणी नदीवरील म्हासुर्ली-चौधरवाडी दरम्यानच्या पाटबंधारे विभागाच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची मे महिन्याच्या अखेरीस केलेली दुरुस्ती पावसाळ्यातील अवघ्या दोन-तीन महिन्यातच वाहून गेल्याचे आज बंधाऱ्यास मातीचा बांध घालताना शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने पाटबंधारे विभागाच्या निकृष्ट कामाचा पंचनामा झाला असून शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. या प्रकारामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत असुन हा बंधारा शेतकऱ्यासाठी की,अधिकाऱ्यांच्या 'अर्थ'पूर्ण सोयीसाठी असा सवाल शेतकऱ्यातून विचारला जात आहे. धामणी खोऱ्यातील अन्य बंधाऱ्यांच्याही याच पद्धतीने एप्रिल मे मध्ये दुरुस्त्या झाल्या असून त्यांची ही अवस्था याहून चांगली नाही.
संबंधित सर्वच बंधाऱ्याच्या कामाची तसेच अधिकारी व ठेकेदारांच्या साटया-लोट्याची चौकशी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. धामणी खोऱ्याला स्वातंत्र्यपूर्व काळापासून तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे.त्यात गेल्या २२ वर्षापासून धामणी प्रकल्प रखडल्याने उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा होत नाही. तसेच शासनाच्या पाटबंधारे विभागाने शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी धामणी खोऱ्यात कोनोली - शेळोशी,म्हासुर्ली - चौधरवाडी, भित्तमवाडी - गवशी, पणोरे - हरपवडे, आंबर्डे - वेतवडे गावाच्या दरम्यान धामणी नदीवर 25 ते 40 वर्षांपूर्वी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत मात्र सर्वच बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट झाल्याने, सर्व बंधाऱ्यात अपेक्षित पाणीसाठा कधीच होत नाही. भ्रष्टाचाराच्या किडीने पोखरलेल्या या कोल्हापूर पद्धतीच्या सर्वसहा गळक्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीवर शासनाच्या पाटबंधारे विभागाने गतवर्षी कोट्यावधीचा निधी पाण्यासारखा खर्च केला आहे.मात्र कामे निकृष्ट झाल्यानेत्याचा किती फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना झाला हा संशोधनाचा विषय बनला आहे.
मे महिन्याच्या अखेरीस या बंधार्याची संबंधित विभागाकडून दुरुस्ती करत असताना निकृष्ट कामाबाबत तक्रार केली होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा खर्च नेमका कोणाच्या फायद्यासाठी?रंगराव चौधरी, शेतकरी, चौधरीवाडी