दत्तात्रय पाटील
कोल्हापूर/ म्हाकवे : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रांजळ व्यक्तीमत्व आहे. मात्र, सध्याचे राजकारण हे निष्ठा आणि भावनिकतेवर होणार नाही. आपण सत्तेत गेलो तरच मतदारसंघात निधी खेचून आणून विकास करू शकतो. या विकास कामांच्या जोरावरच आपण पुढील निवडणूकातही यशस्वी होवू. त्यामुळे खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे.अशी आग्रही भूमिका मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी मांडली. खासदार मंडलिक यांनी शिंदे यांनाच पाठिंबा द्यावा असा दबाव गटही कार्यकर्त्यांनी निर्माण केला. हमिदवाडा (ता.कागल)येथिल सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावर मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांची व्यापक बैठक झाली.अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते.यावेळी विरेंद्र मंडलिक यांनी कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना हात उंचावून सर्वानीच पाठिंबा व्यक्त केला. जिल्ह्याच्या राजकारणात मंडलिक यांच्या निर्णयाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वाचे डोळे लागले होते. मुरगुडचे नगराध्यक्ष राजे खान जमादार यांनी प्रास्ताविक केले यावेळी आर डी पाटील-कुरुकुलीकर, अतुल जोशी (कागल) सत्यजित पाटील (सोनाळी) एन एस चौगुले (सोनाळी),आनंदराव फराकटे (बोरवडे), भगवान पाटील (बानगे), अनिल सिद्धेश्वर (कुरणी), नामदेवराव मेंडके (मुरगुड) जयवंत पाटील (कुरुकली) सुधीर पाटोळे (एकोंडी), दत्ता कसलकर (हणबरवाडी) यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी जि.प.सदस्या शिवानी भोसले, सदासाखरचे उपाध्यक्ष बापुसाहेब भोसले,केशव पाटील, प्रकाश पाटील, रामचंद्र सांगले,दिनकर पाटील, दत्तात्रय सोनाळकर,दत्तात्रय चौगले,शेखर सावंत,बालाजी फराकटे आदी उपस्थित होते.माजी सभापती विश्वास कुराडे यांनी आभार मानले.
निर्णयाचा चेंडू मंडलिक यांच्या कोर्टात... १९६०पासून आम्ही मंडलिक गटाशी एकनिष्ठ आहोत. आमची दुसरी आणि तिसरी पिढी या गटात त्याच जोमाने गटाच्या अस्तित्वासाठी कार्यरत आहे. मतदारसंघात विकासाची गंगा तळागाळापर्यंत घेवून जाण्यासाठी सत्तेत सहभागी व्हावे असा आमचा आग्रह असून खासदार मंडलिक यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. त्यांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही ठाम राहु असा विश्वासही अनेक कार्यकर्त्यांनी दिला.
विचार विनिमयाचा शिरस्ता कायम... लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी कोणताही राजकीय निर्णय घेताना कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करूनच निर्णय घेतले. अगदी तोच शिरस्ता कायम ठेवून खासदार संजय मंडलिक व विरेंद्र मंडलिक यांचीही वाटचाल सुरू आहे.कार्यकर्त्यांची मते आजमाविली याबाबतही अनेकांनी समाधान व्यक्त केले.