कोल्हापूर : मुरगूड (ता. कागल) येथील अश्लील चित्रफितीच्या प्रकरणात पोलिसांची बघ्याची भूमिका गावच्या बदनामीला हातभार लावणारी ठरत आहे. गावाने मोर्चा काढून चौकशीची मागणी केली तरी पोलिस कुणीतरी तक्रार केल्याशिवाय चौकशी करणार नाही, असे म्हणत असून, याचेच ग्रामस्थांना आश्चर्य वाटत आहे. हे प्रकरण एका घातपाताच्या प्रकरणाशी निगडित असल्याची चर्चा गावांत जोर धरू लागली आहे.अश्लील चित्रफितीचे प्रकरण डिसेंबरपासून गावात दबक्या आवाजात चर्चेत आहे; परंतु ती नुसतीच चर्चा होती. त्याबद्दल ठोस माहिती कुणाकडेच नव्हती; परंतु गेल्या आठवड्यात या चित्रफितीचे पेनड्राइव्ह व असहाय महिलांची तक्रार असल्याचे दाखवून निनावी पत्रे ग्रामस्थांना पाठविण्यात आली. त्यामुळे गावांत खळबळ उडाली. या चित्रफिती नेमक्या किती आहेत, हे कुणालाच माहिती नाही; परंतु पंधरा-सोळा व्हिडीओ व किमान साठहून जास्त अश्लील फोटो त्यामध्ये असल्याचे समजते.
चित्रफित केलेल्या काही रुग्ण, काही अशाच जोडलेल्या व काही व्यक्तिगत संबंधित असल्याची चर्चा आहे. त्याने त्यांचा गैरफायदा घेऊन या चित्रफिती तयार केल्या. त्यातील काही लॉजमध्येही केल्याची माहिती आहे. त्या गावातीलच एका तरुणाच्या लॅपटॉपमध्ये ठेवल्याचे समजते. परंतु त्या व्हायरल झाल्यावर चित्रफितीचा गवगवा झाला. त्यात दोन दिवसांपूर्वी त्या चित्रफितीचे स्क्रीनशॉट काढून त्याचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढून त्याचा गठ्ठाच बसस्थानकाजवळ कुणीतरी टाकून दिला. त्यातून गावात पुन्हा खळबळ उडाली. एवढे सगळे होऊनही पोलिस त्या प्रकरणाकडे पाहायला तयार नाहीत. पोलिसांनी या चित्रफिती कुणी व्हायरल केल्या किंवा निनावी पत्रे कुणी पाठवली..? त्यांचा त्यामागे काय उद्देश आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. एका बोगस डॉक्टराच्या कृत्यामुळे गावाची नाहक बदनामी होत असून, रोज एका नव्या चर्चेला तोंड फुटत आहे. अनेक कुटुंबे त्यामुळे वेगळ्याच तणावाखाली आहेत.
मातब्बरांचे गाव..मुरगूडमध्ये एकाहून एक मातब्बर राजकीय नेते आहेत. परंतु गावाच्या बदनामीशी संबंधित या प्रकरणात कोणीच दखल घ्यायला तयार नाही.