कोल्हापूर : पोल बेंडिंग, इक्वेशन, शो जंप टाॅप स्कोर अशा घोडेस्वारीच्या कौशल्यपूर्ण प्रकारात घोडेस्वारांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत उपस्थितीत करवीरकरांची टाळ्याच्या गजरात दाद मिळवली. निमित्त होते कोल्हापूर इक्वेस्टिरयन असोसिएशनतर्फे पोलो मैदानावर शुक्रवारपासून आयोजित केलेल्या द राॅयल हाॅर्स शो चे. या अश्व शोचे शाहू महाराज यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले.या प्रसंगी याज्ञसेनीराजे, मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, यशस्विनीराजे, यशराजराजे यांच्यासह महापालिका प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.या शोची सुरुवात उद्घाटनापूर्वीच सकाळी साडेआठ वाजता झाली. यामध्ये खुल्या गटातील घोडेस्वारांनी प्रथम शो जंप टाॅप स्कोर प्रकारातील कौशल्य दाखवले. त्यानंतर चौदा वर्षाखालील घोडेस्वारांनीही याच प्रकारात कौशल्य दाखवित उपस्थितांची वाहवा मिळवली. चौदा वर्षाखालील घोडेस्वारांनी पोल बेंडिंगमधील कौशल्य दाखविले. दुपारच्या सत्रात या शोचे उद्घाटन झाले. त्यानंतर श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल, जापलुप इक्वेस्टिरयन सेंटर, द ग्रीनफिंगर्ज स्कूल (अकलूज), आर्यनस वर्ल्ड स्कूल, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल, वरदा रायडिंग क्लब, दक्षिण व्हॅली इक्वेस्टिरयन सेंटरच्या घोडेस्वारांनीही कसब दाखवित टाळ्यांची दाद मिळवली. यावेळी वीरेंद्र घाटगे, अच्युत करांडे, एबल फिलीप, जैद मुजावर, श्रेया घाटगे, कृतिका कारंडे उपस्थित होते.
कोल्हापुरात 'द रॉयल हॉर्स शो'; घोडेस्वारांनी दाखवली शो जंप टॉप स्कोर, पोल बेंडिंगमधील कौशल्य, करवीरकरांची दाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 12:40 PM