- राम मगदूम
गडहिंग्लज- कुर्ता पेटला, पोट भाजल तरीही त्याने भगवा झेंडा हातातून खाली पडू दिला नाही. म्हणूनच तमाम गडहिंग्लजकरांनी जिद्दी सोहमच्या शिवप्रेमीला सलाम केला. सोहम सूरज गवळी (वय ११) असे त्याचे नाव असून तो येथील क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये तिसरीमध्ये शिकत आहे. शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणताना शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेची गडहिंग्लजसह परिसरात विशेष चर्चा आहे.हकीकत अशी, येथील शेंद्री रोडवरील काळभैरी फुटबॉल क्लबतर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाते. त्यात परिसरातील तरूणांबरोबरच बच्चे कंपनीदेखील मोठ्या उत्साहात सहभागी होते.
सकाळी लाखेनगरातील स्वागत कमानीनजीकच्या श्री काळभैरी पादुका कट्याजवळ शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते शिवज्योत आणण्यासाठी गडहिंग्लजजवळच्या किल्ले सामानगडावर गेले होते. त्यावेळी सोहमदेखील वडीलांच्या रिक्षातून सोबत गेला होता. परंतु, गडावरून येताना तो गडहिंग्लजपर्यंत शिवज्योतीबरोबर धावत आला. शिवज्योत काळभैरी रोडवर पोहोचल्यानंतर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून शिवज्योतीचे स्वागत केले.
दरम्यान, एका ठिकाणी स्वागत सुरू असताना मशालीतून उडालेली ठिणगी सोहमच्या भगव्या कुर्त्यावर पडली. कुर्त्याने पेट घेतल्यामुळे पोटाला भाजू लागल्याने त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे त्याच्या कुर्त्याने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच सोबतच्या तेजस बिसुरे व अथर्व केनवडेकर या मित्रांसह कार्यकर्त्यांनी तातडीने आग विझवली. दवाखान्यातील उपचारानंतर त्याला संध्याकाळी घरी आणण्यात आले. आता त्याची प्रकृती ठीक आहे. उपनगराध्यक्ष महेश कोरी व मंडळाचे अध्यक्ष दयानंद पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सोहमच्या शिवभक्तीचे कौतुक केले.
रिक्षाचालकाचा मुलगा
सोहमचे वडील सूरज गवळी हे रिक्षाचालक आहेत. शिवज्योत आणण्यासाठी तेही रिक्षा घेवून सोबत गेले होते. शिवज्योतीच्या पाठीमागे कांही अंतरावर त्यांची रिक्षा होती. अचानक गोंधळ उडाल्यामुळे धावत पुढे गेल्यानंतर सोहमच्या कुर्त्याने पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलगा जखमी झाला, तरीही भगवा खाली पडू न दिल्याबद्दल त्यांनी आनंदाने अभिमान व्यक्त केला.