कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धाच्या झळांपासून वाचण्यासाठी पोलंडवासीय कोल्हापूरच्या आश्रयाला आले. जीवाला जीव देणाऱ्या कोल्हापूरने या नागरिकांना फक्त निवाराच दिला नाही तर त्यांना आपल्या संस्कृतीत सामावून घेतले म्हणूनच आजही पोलंडवासीय आणि कोल्हापूरकर यांच्यातील जिव्हाळ्याचा धागा जोडला आहे. अनेक वर्षे ज्या मातीत राहिले त्या गांधीनगर परिसरातील वळिवडे कॅम्पमधील पोलंडवासीयांच्या त्याच भावना आज अमेरिकेतील रंगमंचावर नाट्यरूपातून उलगडणार आहेत. न्यू जर्सी येथील डॉ. मीरा नेरूरकर यांनी हे नाटक लिहिले आहे.पोलंडवासीयांसाठी शहाजी महाराज यांनी सन १९४३ ते १९४८ च्या काळात वळिवडे येथे वसाहत उभारली. तब्बल पाच हजार नागरिक पाच वर्षे सुखरूप राहून मायदेशी परतले. ८० वर्षांनंतरही कोल्हापूरकरांसोबत हे ऋणानुबंध कायम आहेत. कोल्हापूर आणि पोलंडमधील हाच धागा अमेरिकेतील डॉ. मीना नेरूरकर यांनी कॅम्प वळिवडे कोल्हापूर या नाटकात गुंफला आहे. त्या स्त्रीरोगतज्ञ म्हणून कार्यरत असून ‘डॉट कॉम मॉम’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ह्या नाटकाने लावणी नृत्याचे पुनरुज्जीवन केले आहे. मराठी बाणा जगभरात पोहोचावा यासाठी त्या कलेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. या नाटकाचे प्रयोग आता सर्वत्र करण्यात येणार आहेत.
वळिवडे कॅम्प पोहोचला अमेरिकेतील रंगमंचावर, पोलंडवासीय आणि कोल्हापूरकरांचे ऋणानुबंध नाट्यरूपातून उलगडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 2:33 PM