पोपट पवारकोल्हापूर : राज्यातील पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालक व बसचालकांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या सर्वांच्या समस्या ऐकून घेणार असून त्यावर आचारसंहितेनंतर निर्णय घेण्याचे आश्वासन सोमवारी 'लोकमत'शी बोलताना दिले. बदलत्या वेळापत्रकामुळे माध्यमिक शाळांचे वेळापत्रक कोलमडत असेल तर 'माध्यमिक'चे वर्ग सकाळी लवकर भरवू, असे संकेतही त्यांनी दिले.लहान मुलांच्या झोपेचे कारण देत राज्य सरकारने नव्या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरविण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. मात्र, या निर्णयावर सर्वच स्तरातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. नव्या वेळेमुळे माध्यमिकचे वर्ग उशिरा घ्यावे लागणार आहेत. शिवाय बसचालकांनीही या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री केसरकर यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी 'नव्या वेळापत्रकामुळे कोणकोणत्या घटकांच्या समस्या आहेत त्यांनी त्या मांडाव्यात. त्यावर निश्चितपणे तोडगा काढला जाईल' अशी ग्वाही दिली.
'माध्यमिक'चे वर्ग सकाळी भरवूनव्या वेळापत्रकामुळे 'माध्यमिक'चे वर्ग उशिरा भरवावे लागतील याकडे मंत्री केसरकर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी 'वर्गखोल्यांचा प्रश्न येत असेल तर मोठ्या मुलांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवू' असे सांगितले.
सर्वांच्या समस्या ऐकून घेणारपूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बदल केल्याने पालकांसह बसचालकांचाही त्याला विरोध सुरू आहे. शिवाय, वर्गखोल्यांची संख्या, सकाळच्या वेळेतील वाहतूक कोंडी, प्रदूषण या समस्याही उद्भवणार असल्याचे मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी 'प्रत्येकाने त्यांना भेडसावणारे प्रश्न मांडावेत. ते सविस्तर ऐकून घेत त्यावर योग्य तो निर्णय घेणार असल्याची ग्वाही दिली.
सकाळच्या शाळेमुळे सध्या लहान मुलांची पुरेशी झोप होत नसल्याचे शास्त्रज्ञांनीच सांगितले आहे. त्यामुळे पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या मुलांच्या शाळांच्या वेळेत बदल केला आहे'. 'या बदलामुळे पालक, बसचालक यांच्यावर काही परिणाम होत असेल तर त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जातील. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मला यावर बोलता येणार नाही. पण, ती संपल्यानंतर त्यांच्या समस्या ऐकून निश्चितपणे यावर तोडगा काढला जाईल - दीपक केसरकर, शिक्षणमंत्री