नितीन भगवानपन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या पश्चिमेस असलेल्या विस्तीर्ण अशा मसाई पठारावर रंगीबेरंगी रानफुलांची मुक्त उधळण सुरु झाली. निसर्ग निर्मीत सप्तरंगाचा हा उत्सव पाहण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांची पठारावर गर्दी होवू लागली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे पण दुर्लक्षीत असलेले मसाई पठार सुमारे १००० एकर सलग आहे. या पठाराचे नऊ विभाग आहेत. या प्रत्येक विभागाला स्थानिक निरनीराळी नावे असुन प्रत्येक विभागातील दरीमध्ये पाणी, झाडे व प्राचीन गुहा आहेत. यापैकी पांडव दरामध्ये असलेली प्राचीन लेणी ही पहाण्या सारखी असुन हा एक संशोधनाचा विषय आहे. तर पठारावर पौराणिक असा ईश्वर म्हादु तलाव असून या परीसरात दुर्मीळ असा गिधाड पक्षी पहावयास मिळतो. पठारावर सप्तरंगी फुलांबरोबरच विविध फुलपाखरे, पक्षी, सरपटणारे प्राणी, ससा आणि गेळा या प्राण्यांच्या चार वेगवेगळ्या जाती पहावयास मिळतात. पठारावरील जांभ्या दगडात दगडी फुलांसारखी दिसणारी दुर्मीळ बुरशी जी माणसाच्या त्वचा विकारावर अत्यंत गुणकारी ठरलेली यावर हाफकिन इन्स्टिट्युट या नामांकित संस्थेने संशोधन करुन सर्वमान्य केलेली अशी बुरशी पहावयास मिळते. विविधरंगी फुलासह, औषधी वनस्पतीरानफुलांचा हंगाम सुरु असून विविध नैसर्गिक फुले निसर्गप्रेमींचे लक्ष वेधुन घेत आहेत. विस्तीर्ण अशा हिरव्या गवताच्या गालीच्यावर फुललेली सफेद मुसळी (क्लोरोफायटम), सोनकी(सेनीसीओ), केना (कॕमेलोना), कापरु (बिओनीआ), मंजीरी (पोगोस्टीमोन डेक्कननेन्सीन), निलवंती( सायनोटीस), सितेची आसव (युट्रीक्युलेरीया), सफेद गोंद (इरिओकोलास), निलीमा (ॲनीलीमा), कंदीलफुल (सिरोपोनीया), दिपकाडी (डिपकॕडी), याशिवाय रान कोथींबीर, रानहळद, जंगली सुरण, तेरडा या औषधी वनस्पती पहावयास मिळतात. मसाई पठारवर वर जाताना अग्निशीखा अर्थात कळलावीची फुले व शतावरीचे वेल, भारंगी या औषधी वेली, झुडपे पहावयास मिळतात पठारावर एकाच जातीच्या पण यात विविध प्रकार असलेल्या फुलांपैकी स्मीथीया म्हणजे पिवळी फुले याच्या पठारावर उगवणाऱ्या नऊ जाती आहेत. या सर्वच जाती मसाई पठारावर ऊगवतात यातील सर्वात मोठे फुल ऊगवणाऱ्या वनस्पतीवरील पिवळ्या फुलावरील पाकळीवर दोन लहान तांबडे ठिपके असतात यालाच मिकीमाऊसची फुले असे म्हणले जाते. समुहाने वाढणारी ही फुले या ठिकाणच्या पाणथळ परीसरात आहेत यात प्रामुख्याने सफेदमुसळी, निळीचीराइत, भुईआमरी (ग्राउंडआर्केड) काळीमुसळी (कुरकीलॕगो), सफेदगेंद ही तर चेंडुच्या आकाराची लहान फुले निसर्गप्रेमींचे लक्षवेधुनच घेतात याच्या पण दहा जाती आहेत यातील पठारावर गोलगेंद, तारागेंद, पानगेंद या जाती प्रामुख्याने दिसतात. ॲडव्हेंचर पार्क वेधून घेतोय पर्यटकांचे लक्षकोल्हापूर पासून ३५ कि.मी.वर असणारे मसाई पठार त्याच्या पायथ्थाशी असणाऱ्या ॲडव्हेंचर पार्क पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. जैवविविधतेने नटलेल्या या ऐतिहासिक, पौराणिक व खगोल अभ्यासकांचे हक्काचे ठिकाण असलेल्या महती बरोबरच नैसर्गिक फुलांमुळे वेगळी ओळख निर्माण होवू लागली आहे. पावसाळ्यानंतर तीन महिने पहावयास मिळतो हंगामनिसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, उत्तर पश्चिम घाटातील बहुतेक पठारावर नैसर्गिक पावसाळ्यानंतर रानफुलांचा हंगाम तीन महिने पहावयास मिळतो. पण मसाई पठारावरील बेसॉल्ट लॕट्राईट खडक हा पाऊस, वारा यांच्या मुळे झिज होवून त्यावर हलक्या प्रमाणात मातीचा थर निर्माण होतो. अन् यावर नैसर्गिक फुलांची बाग तयार होते.
कोल्हापूर: मसाई पठारावर रानफुलांची मुक्त उधळण, पर्यटकांची होवू लागली गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 2:09 PM