शिये : साखरेची पोती भरलेला ट्रक रस्त्याकडेला उलटल्याने त्याखाली सापडून मेंढपाळाचा जागीच मृत्यू झाला. दगडू शिवाप्पा बाडकर (वय ६७, रा. निगवे दुमाला) असे अपघातात ठार झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे. ही दुर्घटना निगवे ते भुयेवाडी या मार्गावर निगवे (ता. करवीर) गावच्या हद्दीत आंबा बसस्टाॅपनजीक रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. मृत दगडू बाडकर हे लोकमत गोवा आवृत्तीच्या वितरण विभागाचे सहायक व्यवस्थापक सागर बाडकर यांचे वडील होत.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, निगवे दुमाला ते भुयेवाडी या रस्त्यावरून रविवारी दुपारी आसुर्ले-पोर्ले येथील दत्त दालमिया साखर कारखान्याचा साखरेची पोती भरलेला ट्रक (एमएच ०९, बीसी ५१८२) जात होता. यावेळी या मार्गावर बसथांब्याजवळच झाडाखाली दुसरा एक ट्रक थांबला होता. साखर भरून निघालेला कारखान्याचा ट्रक भरधाव वेगाने, रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात होता.त्यावेळी दगडू बाडकर हे आपल्या मेंढ्या चरण्यास सोडून रस्त्याकडेला उभे होते. त्याच वेळी ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला अन् तो ट्रक रस्त्याकडेला थांबलेल्या बाडकर यांना धडकला. तसेच त्या बाजूला रस्ता सखल असल्याने ट्रक त्याच ठिकाणी साखरेच्या भरलेल्या पोत्यांसह उलटला. त्याखाली सापडल्याने दगडू बाडकर हे जागीच ठार झाले. त्याशिवाय त्यांच्या दोन मेंढ्यांचाही त्याखाली सापडून मृत्यू झाला.या अपघातानंतर परिसरात गोंधळ उडाला. परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी मदतकार्य केले; पण मेंढपाळ बाडकर यांचा मृतदेह ट्रकखाली पूर्णपणे अडकल्याने तो काढण्यात मोठ्या अडचणी होत्या.घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी गर्दी पांगवली. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात ट्रकचालक संतोष हिंदूराव पाटील (रा. कणेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. बाडकर यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
साखरेची पोती भरलेला ट्रक अंगावर उलटल्याने मेंढपाळ ठार, निगवे येथील दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 11:57 AM