इंदुमती गणेशकोल्हापूर : गर्भलिंग निदानावर वॉच ठेवण्यासाठी २०१०-११ साली जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर व रुग्णालयांमध्ये बसवण्यात आलेली ‘सायलेंट ऑब्झर्व्हर’ या यंत्रणेला कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली. आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पुढाकाराने बसविलेल्या या यंत्रणेमुळे जिल्ह्यातील गर्भलिंग चाचणीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र रेडिओलॉजिस्ट संघटनेने केलेल्या विरोधामुळे चांगली व्यवस्था बंद पडली दुसरीकडे शासनाच्या पोर्टलमध्ये असलेल्या त्रुटींमुळे गर्भलिंग निदान झाले तरी कळत नाही.जिल्ह्यात २००८ ते २०१२ या काळात देशात पन्हाळ्यात व जिल्ह्यात स्त्री जन्मदर सगळ्यात कमी होता. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी देशमुख यांनी सायलेंट ऑब्झर्व्हर व ॲक्टिव्ह ट्रॅकर ही प्रणाली पुढे आणली. एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीने तंत्र विकसित केले होते. जिल्ह्यात कोठेही गर्भलिंग निदान झाले की ते नियंत्रण कक्षाला समजायचे. त्यामुळे गर्भलिंग निदान चाचणीचे प्रमाण कमी झाले होते. या कार्याचा गौरव करत देशमुख यांचा देशपातळीवर गौरव झाला. मात्र त्यांची बदली झाली आणि सायलेंट ऑब्झर्व्हरदेखील सायलेंट झाले.
असे काम करायची यंत्रणासोनोग्राफी मशीनमध्ये सायलेंट ऑव्झर्व्हर बसविले की दिवसाला किती सोनोग्राफी झाले त्यांचे आपोआप व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हायचे. त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या कंट्रोल रुमला कळायची. व्हिडीओ क्रॉस चेक केले जात होते. पण त्याचा दोष असा होता की ते बंद चालू करता यायचे. त्यावर उपाय काढत ॲक्टिव्ह ट्रॅकर लावण्यात आले. सोनोग्राफी मशीन सुरू केले की हे ॲक्टिव्ह ट्रॅकर आपोआप कार्यान्वित व्हायचे आणि मेसेजद्वारे यंत्रणेला कळायचे. दिवसभरात झालेल्या चाचण्यांचा अहवाल यायचा.
का बंद पडली यंत्रणा....यंत्रणा बसविण्यासाठी जिल्हा नियोजनमधून थोडा निधी देण्यात आला होता. उर्वरित खर्च सोनोग्राफी सेंटर किंवा दवाखान्याने करायचा होता, सोनोग्राफीचे रेकॉर्ड ठेवायचे होते, त्यामुळे रेडिओलॉजिस्ट संघटनेने शासनाला तक्रार केली. त्यामुळे शासनाने स्वत:चेच पोर्टल विकसित केेले आणि कोणतेही स्थानिक सॉफ्टवेअर वापरायचे नाही असा अध्यादेशच काढला.
शासनाच्या पोर्टलमध्ये त्रुटीशासनाने pcpndt.maharashtra.govt.in हे पोर्टल विकसित केले या पोर्टलवर सोनोग्राफी सेंटर व रुग्णालयांनी माहिती भरून पाठवायची आहे. मात्र या यंत्रणेत त्रुटी असून, क्रॉस चेक करण्याची सोय नाही. व्हिडीओ रोकॉर्डिंग होत नाही, गर्भलिंग निदान होते की नाही हे यंत्रणेला कळत नाही.