कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचगंगा, ताम्रपर्णी, हिरण्यकेशी आणि वेदगंगा या नद्यांमधील गाळ काढण्यात येणार आहे. हा गाळ टाकण्याची ठिकाणे निश्चित झाल्यावर त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल. त्यामुळे गाळ टाकण्याच्या जागांची पाहणी करा व खर्चाचा आराखडा बनवा, अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापालिका प्रशासक के.मंजुलक्ष्मी, जल अभियंता हर्षजीत घाटगे, जलसंपदा कार्यकारी अभियंता स्मिता माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, पंचगंगेतील शिवाजी पूल, राजाराम बंधारा, शिये पूल व रुकडी बंधारा परिसर निश्चित केला आहे. तसेच अन्य नदीपात्रातील जागा निश्चित केल्या आहेत. मात्र, काढलेला गाळ टाकायचा कुठे, हे ठरलेले नाही. गाळ टाकण्याची ठिकाणे ब्लूू किंवा रेड पूररेषेमध्ये नसावीत. या गाळाचा कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या.जिल्ह्यातील नद्यांना येणाऱ्या महापुराला त्यातील गाळ, नदीपात्रातील अनावश्यक बांधकाम, पुलांच्या बांधकामासाठी बांधलेले तात्पुरते रस्ते असे अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यामुळे हा गाळ काढावा, अशी सूचना तज्ज्ञांनी केली आहे. महापूर नियंत्रणाच्या उपाययोजनेमध्येही नद्यांमधील गाळा काढावा, असे सांगण्यात आले आहे. याचा विचार करून जलसंपदा आणि आपत्ती निवारण विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून नद्यांमधील गाळ काढण्यात येणार आहे. गाळ काढल्यामुळे नदीतील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' नद्यांमधील गाळ काढणार, पण टाकणार कुठे ?; जिल्हा प्रशासनासमोर पेच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 1:54 PM